महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम; छत्रपती संभाजीनगरमधील चित्र काय? वाचा, खास स्टोरी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2025 मध्ये काय चित्र आहे आणि कोणत्या पक्षाची काय स्थिती आहे असा हा रिपोर्ट.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक (Election) २०२५ साठीचं चित्र स्पष्ट होऊन प्रचाराची जोरदार सुरूवात झाली आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालानुसार एकूण ५५४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून आता ८५९ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका राज्यभरात गाजली. त्याला कारण ठरलं भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील इच्छूक उमेदवार. कुणी 20 वर्षापासून, कुणी 15 वर्षापासून, कुणी 12 वर्षापासून पक्षात सक्रीय पातळीवर काम करतय. मात्र, उमेदवारी देण्यावेळी यांना बाजूला करुन दोन महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी आणि काही तर काल येऊन आज पक्षात उमेदवार झाले. हे सगळ समोर येताच स्वत:ला पक्षाचे निष्ठावंत म्हणणाऱ्या इच्छूक महिला आणि पुरुषांची तळपायाची आग मस्तकात गेली अशी परिस्थिती होती.
मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना खासदारांना आमदारांना साहेब म्हणणारे कार्यकर्ते बेफाम शिव्या देत सुटले होते. कुणी गाडीवर दगड फेकला, कुणी प्रचार कार्यालयात आक्रोश केला, कुणी अमरण उपोषणाला बसलं तर कुणी चक्कर येऊन कोसळं असं चित्र संपूर्ण शरहभर पाहायला मिळालं. या वातावरणाती चर्चा असतानाच शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती तुटल्याचं जाहीर करण्यात आलं आणि या आगीत आणखी तेल ओतल्याचं काम झालं. अनेक कार्यकर्ते पुन्हा डावलले गेले आणि आपली मुलं नातेवाईक आणि काँट्रक्टरला उमेदवारी दिल्याचा पुन्हा आरोप आणि आक्रोश पाहायला मिळाला.
BMC निवडणुकीत ट्विस्ट, अमराठी मतदार गेम फिरवणार; सर्व्हेतील आकड्यांनी खळबळ
मग काय पालकमंत्र्यासह मंत्री, खासदार, आमदार माजी विरोधी पक्षनेते आणि सगळेच स्थानिक नेते नाराजांच्या घरी-दारी जायला लागले आणि समजूत घालायला लागले. अनेकांची या नाराज लोकांची नाराजी दूर करताना दमछाक झाली अशी परिस्थिती होती. अखेर, कुणाला कुठलतरी पद, कुठलातरी आश्वासन आणि काही ठिकाणी थेट पैशांचे व्यवहार झाला, पण त्याची उघड चर्चा होणार नाही याची काळजी घेतली आणि हे मिटवत आता निवडणुकीसाठी सर्व काही अलबेल आहे असं वातावरण तयार केलं. हे सगळं होताना काहींनी माघार नाहीच, आता मैदाना मारायचंच अशी शपथ घेत अपक्ष अर्ज केला होता तो तसाच ठेवला अन् अखेर बंडखोरी केलीच.
छत्रपती संभाजीनगर हे शहर गेली दोन दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जात.स्व. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग या शहरात आहे. परंतु, या पक्षाची 2022 ला दोन शकलं झालेली आहेत. तेव्हापासून या शहरात शिवसैनिक आणि निष्ठावंत अशा दोन बाजू उभ्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली तेव्हा शहरातले शिवसेनेचे मोठे नेते संजय शिरसाट यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. ते आज जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे एकनिष्ठ असलेले चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.
पुढे दानवे यांना विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याने त्यांनी शहरातील आणि जिल्ह्यातील संघटन कायम ठेवण्याचं काम केलं. पण, पालकमंत्री शिरसाट यांच्याकडं सत्ता असल्याने अनेकांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना दुभंगल्याचं चित्र येथे आहे. त्यामुळे आता दुभंगलेल्या अवस्थेत पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक होत असून लोक कुणाला साथ देतात हे पाहण महत्वाचं असणार आहे. दरम्यान, भाजपही गेली अनेक काळ शिवसेनेत युतीत होता. यावेळीही आहे पण वेगळ्या झालेल्या शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे स्वतंत्र लढत असताना त्यांनाही किती यश मिळतं हे पाहावं लागणार आहे. कारण, येथे शिवसेना कायम मोठा भाऊ राहिलेला आहे. महापौर होईल असं यश भाजपला कधी आलेलं नाही. त्यांचा तो यावेळी प्रयत्न आहे हे नक्की.
शरहरात एमआयए पक्षाचीही मोठी ताकत राहिलेली आहे. मागच्यावेळी एमआयएम दोन नंबरला आणि भाजप तीन नंबरला अशी स्थिती होती. आजही 3 ते साडेतीन लाख मुस्लमी मतदान आहे. ते किती एमआयएमच्या बाजूने जातं यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. परंतु, एमआयएमचे माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी चांगला जोर लावल्याचं चित्र आहे. एकंदरीत छत्रपती संभाजीनगर शहरात भाजप शिवसेना शिंदे गटच नाही तर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि वंचितही स्वतंत्र निवडणुका लढवत आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आपली ताकत दाखवायची आहे आणि सर्वांनाच गनिमी कावा करून आपण कसा डाव टाकला हे दाखवायचं आहे असं सध्याचं चित्र आहे.
कुणाचे किती उमेदवार?
उबाठा शिवसेना- 97
भाजप- 94,
शिवसेना शिंदे- 92,
काँग्रेस- 77,
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार- 77,
वंचित बहुजन आघाडी- 62,
एमआयएम- 48,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष- 25,
बसपा- 21,
रिपाई आठवले गट- 6
अपक्ष- 260
एकूण 859 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
2015 मध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?
शिवसेना 28
एमआयएम 24
भाजप 23
काँग्रेसला 12
अपक्ष 18
बसपा 4
राष्ट्रवादी काँग्रेस 4
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डे) 2
एकूण जागा 115
