‘कोरटकरला वाचवणारी यंत्रणा…जनतेसमोर आणा’ अटकेनंतर, इंद्रजित सावंत यांची मोठी मागणी

Indrajit Sawant’s reaction after Prashant Koratkar Arrest : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) पोलिसांनी अटक केली आहे. त्याने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा देखील आरोप आहे. दरम्यान कोरटकरला अटक केल्यानंतर इंद्रजित सावंत यांची (Indrajit Sawant) प्रतिक्रिया समोर आलीय. त्यांनी म्हटलंय की, अशा चिल्लर माणसाने एक महिना तंगवातंगवी केली. ही खूप मोठी गोष्ट आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की, एक महिना अखंड महाराष्ट्रातील, देश विदेशातील अनेक शिवप्रेमी छत्रपतीय शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल विष ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करावी म्हणून सातत्याने मागणी करत (Prashant Koratkar Arrest) होते. त्यांनी सातत्याने सोशल मिडिया आणि इतर माध्यमांवर विषय लावून धरला होता. त्या सगळ्या शिवप्रेमींचे मी पहिल्यांदा आभार मानतो, असं देखील इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय.
मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक, कोल्हापूर पोलिसांची कारवाई
इंद्रजित सावंत म्हणाले की, या सगळ्यात त्यांनी खूप चांगला पाठिंबा दिलाय. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर दबाव आला. पोलीस यंत्रणेने चांगलं काम केलं. माझे वकिल असीम सरोदे आणि सहकारी सर्व पाठीमागे होते. एका विकृत व्यक्तीला अटक झाली आहे, विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झाली. त्याबद्दल समाधान आहे, पण जोपर्यंत कायदेशीररीत्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा लढा चालुच राहील, अशी प्रतिक्रिया इंद्रजित सावंत यांनी दिली आहे.
आमच्या वकिलांनी खूप चांगल्या प्रकारे बाजू मांडली होती. म्हणून कोल्हापूर न्यायालयातील प्रशांत कोरटकरचा जामीन नाकारला गेला होता. उच्च न्यायालयात देखील तशीच परिस्थिती होती. जामीन नाकारला जाणार, असं दिसत होतं. त्यामुळे कदाचित कोरटकरला वाचवणारी यंत्रणेने त्याला महिनाभर सल्ला दिला असावा, तुझ्याकडे काही पर्याय नाही. म्हणून त्याने अटक करून घेतली असावी, असं देखील इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय.
मोठी बातमी : मोदी सरकारकडून देशातील खासदारांना मोठं गिफ्ट; पगार, पेन्शन अन् भत्त्यात वाढ जाहीर
खरं तर मोबाईलचे तांत्रिक पुरावे जे आहेत, ते सगळे पोलिसांकडे अगोदरच जमा केलेले आहेत. त्यामुळे याच्यावर चांगल्या पद्धतीने कारवाई होईल, असा मला विश्वास आहे. कारण ही लोकशाही आहे. पण जी काही मंडळी त्यांना सपोर्ट करत होती, अशा मंडळींचा शोध आता घेतला पाहिजे. तो महिनाभर कुठे राहिला? त्याच्या संपर्कात कोण होतं? त्याला का सपोर्ट करत होती? त्याने काय-काय हालचाली केल्या? या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजेत, अशी मागणी देखील इंद्रजित सावंत यांनी केलीय.