‘ही’ होती अजित दादांची शेवटची इच्छा…; जयंत पाटलांकडून आठवणींना उजाळा
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला.
Jayant Patil brings back memories of Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. 28 जानेवारीच्या पहाटेच ही दुःखद बातमी समोर आली आणि क्षणार्धात बारामतीसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा धक्का बसला.
या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. “अजित दादांमध्ये विलक्षण जिद्द होती. ते अत्यंत मेहनती, चिकाटीचे आणि निर्णयक्षम नेते होते,” असे सांगत त्यांनी दादांशी असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जयंत पाटील यांनी महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात, याबाबत चर्चा सुरू होती. “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंघ व्हाव्यात, ही अजित दादांची मनापासून इच्छा होती. त्या दृष्टीने काही बैठका नुकत्याच झाल्या होत्या,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोठी बातमी! यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
व्यक्तिगत आठवणी शेअर करताना जयंत पाटील भावुक झाले. ‘माझ्या वेषभूषेबद्दल ते नेहमी मिश्किल टिप्पणी करायचे. असे अनेक वैयक्तिक प्रसंग आहेत, जे कधीही विसरता येणार नाहीत,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या अपघाताबाबत बोलताना जयंत पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “या घटनेत कोणताही घातपात असल्याचे संकेत नाहीत. मात्र, खासगी विमानांच्या सुरक्षेबाबत अधिक कडक प्रोटोकॉल आणि तपासणीची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. अजित पवार यांच्या निधनाने केवळ एक अनुभवी नेता नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी आणि निर्णायक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
