बावनकुळेंकडून कोंडी, रविंद्र चव्हाणांचा हस्तक्षेप : निलेश राणेंच्या निवृत्त नाट्याची पडद्यामागील स्टोरी

बावनकुळेंकडून कोंडी, रविंद्र चव्हाणांचा हस्तक्षेप : निलेश राणेंच्या निवृत्त नाट्याची पडद्यामागील स्टोरी

सिंधुदुर्ग : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय अवघ्या 24 तासात मागे घेतला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी तलवार म्यान केली आहे. संघटनेतील काही गोष्टींमुळे राणेंनी हा निर्णय घेतला होता, मात्र आता त्यांची नाराजी दूर झाली आहे. आता यापुढील काळात त्यांच्या नेतृत्वात आम्ही सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये काम करु, कोकणात जो त्यांचा झंझावत आहे, तो असाचं सुरु राहिलं, असं चव्हाण यांनी यानंतर बोलताना स्पष्ट केलं. (Former MP Nilesh Rane withdrew his decision to retire from active politics in just 24 hours)

मात्र त्याचवेळी निलेश राणे यांच्या निवृत्ती नाट्याच्या स्टोरी ही वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याच आशीर्वादाने लिहिली असल्याचे बोलले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याचे आणि आगामी काळातील निवडणुकांचे राजकारण यामागे असल्याचे सांगितले जाते. शिवाय सध्याच्या आणि आगामी राजकारणाचा थेट संबंध हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी असल्याचा दिसून येतो.

लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणेंची मोर्चेबांधणी :

नारायण राणे यांची राज्यसभेची मुदत पुढील वर्षी संपत आहे. त्यानंतर भाजप त्यांना काय जबाबदारी देणार, हे सध्या अनिश्चित आहे. पण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून उमेदवारीसाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. इथून सध्या राणेंचे निकटवर्तीय आणि भाजपचे निष्ठावंत प्रमोद जठार हे पक्षातूनच इच्छुक आहेत. तर त्याचवेळी शिंदे गटातून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांनीही इथून तयारी सुरु केली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश! निलेश राणेंची नाराजी दूर; निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे

निलेश राणे यांना 2019 च्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाकडून लढताना पाऊणे तीन लाखांच्या आसपास मते मिळाली होती. मूळ भाजपची तीन लाख आणि राणेंची पाऊणे तीन लाख अशी सहा लाखांच्या आसपास मते असल्याने हा मतदारसंघ भाजपकडेच घ्यावा असा दावा करत नुकतेच नितेश राणे आकडेमोड केली होती. हा मतदारसंघ भाजपकडे घेऊन तिथून नारायण राणे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राणे समर्थकांकडूनही केली जात आहे.

निलेश राणेंची विधानसभेसाठी तयारी :

दुसऱ्या बाजूला निलेश राणे यांनी नारायण राणे यांच्या कुडाळ मतदारसंघातून तयारी सुरु केली आहे. या मतदारसंघाचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. 2014 मध्ये नारायण राणे यांना याच मतदारसंघातून पराभव स्विकारावा लागला होता. त्याची सल राणे कुटुंबांच्या मनात आजही कायम आहे. मात्र शेजारी कणकवलीमध्ये नितेश राणे विद्यमान आमदार आहेत. मग आता दोन्ही भावांना विधानसभेला आणि वडिलांना लोकसभेला उमेदवारी कशी द्यायची असा सवाल पक्षातच विचारला जात आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंकडून राणेंच्या घराणेशाहीला विरोध?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गेल्याच आठवड्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा झाला. या दौऱ्यात बावनकुळे यांनी एकाच घरात तीन तिकिटे देणार नसल्याचा स्पष्टपणे संकेत दिला. याच संकेतांचा परिणाम बावनकुळे यांच्या दौऱ्यावर जाणवला. स्वतः निलेश राणे या दौऱ्यात फारसे दिसून आले नाहीत. शिवाय राणे समर्थकही या दौऱ्यापासून लांब राहिलेले दिसून आले.

जरांगे पाटलांकडून पुन्हा उपोषणाचा एल्गार! गिरीश महाजनांची अखरेच्या क्षणापर्यंतची शिष्टाई निष्फळ

रविंद्र चव्हाणांचा जिल्ह्यात हस्तक्षेप :

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भाजपमध्ये दोन गट असल्याचे बावनकुळे यांच्या दौऱ्यात दिसून आले होते. एक गट हा मूळ भाजपचा तर दुसरा गट राणेंच्या भाजपचा. रविंद्र चव्हाण हे पालकमंत्री झाल्यापासून मूळ भाजपला ताकद देत असून राणेंच्या समर्थकांना डावलत असल्याचा आरोप केला जात आहे. राणे यांना जिल्ह्यातील घडामोडींमध्ये, निधी वाटपामध्ये विचारात घेतले जात नाही, ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार वैभव नाईक यांना ताकद देत आहेत, निधीसाठी त्यांना झुकते माप देत आहेत. असेही आरोप त्यांच्यावर केले जात आहेत.

वैभव नाईक शिंदेसोबत येणार?

वैभव नाईक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. अशावेळी विद्यमान आमदार म्हणून येथे त्यांनाच उमेदवारी मिळणार, हे उघड आहे. वैभव नाईक शिंदेंसोबत आल्यास निलेश राणे यांच्या उमेदवारीला खो बसण्याची शक्यता आहे. हीच शक्यता ओळखून राणे यांचा नाईक यांच्या प्रवेशाला विरोध आहे.

याच राजकाणामुळे लिहिली गेली निवृत्तीची स्क्रिप्ट :

भाजपमध्ये संघटनात्मक गटबाजी माध्यमांसमोर, लोकांसमोर आणण्यास मज्जाव आहे. कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करावी असा नियम आहे. मात्र एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलानेच हा नियम मोडावा आणि ही गोष्ट दिसती तेवढी सरळ समजावी, यासाठी भाजपचाच कार्यकर्ता तयार होत नाही. केंद्रीय मंत्री असल्याने नारायण राणे यांना राजकीय खेळी करण्यास मर्यादा येतात. मात्र निलेश राणेंना त्या मर्यादा नाहीत. त्यामुळेच वर उल्लेख केलेले राजकारण आणि त्यातून तयार झालेली कोंडी फोडण्यासाठी, पक्ष श्रेष्ठींचे लक्ष वेधून घेत आपली कोकणातील ताकद दाखवत शक्तीप्रदर्शन करण्यासाठीच निलेश राणे यांनी हा आटापिटा केला असल्याचे बोलले जाते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube