मुलाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राणे सज्ज; ठाकरेंच्या राऊतांचंही कडवं आव्हान

मुलाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राणे सज्ज; ठाकरेंच्या राऊतांचंही कडवं आव्हान

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : महायुतीच्या जागावाटपात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची राज्यभरात चर्चा झाली. या मतदारसंघातील नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे तिढा निर्माण झाला होता. अखेर या तिढ्यावर मात करत भाजपने हा मतदारसंघ खेचून घेतला. किरण सामंतांना माघार घ्यायला लावली आणि नारायण राणेंचं तिकीट पक्कं केलं. नारायण राणेंनी प्रचार सुरू केला. पहिल्याच दमात अडीच ते तीन लाख मतांनी विजयी होऊ असा हुंकार त्यांनी भरला. आता इतक्या लीडने राणे खरंच विजयी होतील का याचं उत्तर ४ जूनला मिळेलचं. पण, त्याआधी भाजपाच्या राणेंना विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी दोन हात करावे लागतील.

या  मतदारसंघात मागील काही दिवसांत घडलेल्या घडामोडींवर नजर टाकली तर लक्षात येते की येथे भाजपाचा हट्ट पुरवण्यासाठी शिंदे गटाने दोन पावलं मागे घेतली.  कारण, या मतदारसंघात उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावा केला होता. निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. तिकीट मिळालं नाही तर बंडखोरीचे संकेतही त्यांनी दिले होते. इतकच काय तर आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठाकरे गटाचं मशाल चिन्ह ठेवत त्यांनी या संभाव्य वादळाची चुणूकही दाखवली होती.

परंतु, त्यांचं हे संभाव्य बंड थांबवण्यात बंधू उदय सामंतांना यश आलं. पण किरण सामंतांनी मतदारसंघावरील दावा सोडलेला नव्हता. याचसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटी त्यांनी घेतल्या. परंतु, या फिल्डिंगचा उपयोग झाला नाही. भाजपनं बाजी मारलीच. नारायण राणे यांच्यासाठी मतदारसंघ सोडवून घेतला. खुद्द उदय सामंत आणि किरण सामंत यांनी मतदारसंघावरील दावा सोडत असल्याचे जाहीर करावे लागले.

मुलाचा दोनदा पराभव आता नारायण राणेंना आव्हान

आता ही महायुतीतील अंतर्गत लढाईत भाजपाची सरशी झाली होती. पण आता मैदानातील दुसरी विरोधी लढाई सुरू झाली आहे. या लढाईत राणेंसमोर विनायक राऊत यांचं तगडं आव्हान आहे. विनायक राऊत दोन टर्म खासदार आहेत. त्यांनी याआधी नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना दोनदा पराभवाची धूळ चारली आहे. यानंतर आता नारायण राणे यांना टक्कर देण्यास सज्ज झाले आहेत.

शिवसेनेतील फुटीमुळे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने तयार झालेली सहानुभूतीची लाट, मतदारसंघातील विकासकामे, दांडगा जनसंपर्क या शिदोरीच्या बळावर यंदाही विजयाची हॅट्रिक करू असा विश्वास विनायक राऊत आणि त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. उद्धव ठाकरेंच्या सभांनीही वातावरण फिरेल असा विश्वास या शिलेदारांना वाटतो. भाजपाचे फोडाफोडीच्या राजकारणाची लोकांच्या मनात राग आहे हा राग मतपेटीतून व्यक्त होईल असे ठाकरे गटाचे नेते सांगतात.

कोकणात चालणार मोदी अन् राणेंचं कॉम्बिनेशन

दुसरीकडे भाजपाचाही आत्मविश्वास वाढला आहे. पीएम मोदींचा करिश्मा, राणेंची मतदारसंघातील ताकद, राऊतांबाबत लोकांची नाराजी, विकासकामांकडे त्यांचं दुर्लक्ष या कारणांमुळे विजयाचा विश्वास भाजपला वाटत आहे. विनायक राऊतांचा मतदारसंघात संपर्क नाही. ठाकरेंनी काँग्रेसशी मैत्री केली हे लोकांना पटलेलं नाही. बाळासाहेबांना मानणारा कट्टर शिवसैनिक दुखावला गेला. उद्धव ठाकरे सभेत विकास, देशहित सोडून दुसरेच काहीतरी बोलत होते. फडणवीसांना विकासाचा मुद्दा मांडला. कोकणात पंतप्रधान मोदी आणि राणे हे कॉम्बिनेशन विकास घडवणार असा दावा भाजप नेते करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज