महायुतीत ट्विस्ट! भाजपाच्या माजी जिल्हा उपाध्यक्षांच्या हाती धनुष्यबाण; विधानसभेत केली होती बंडखोरी

Raigad News : राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. त्यानंतर आघाडीतील (Raigad News) तिन्ही पक्षांना गळती लागली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही गळती वाढली आहे. दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतही रस्सीखेच सुरू आहे. स्थानिक पातळीवरील नेते फोडण्याचा कार्यक्रम महायुतीत सुरू आहे. आताची ताजी बातमी रायगड जिल्ह्यातून आली आहे. येथे भाजपला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपात बंडखोरी करणारे दिलीप भोईर (Dilip Bhoir) यांनी आज शिवसेनेचा धनु्ष्यबाण हाती घेतला.
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात येथील जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे भोईर निराश झाले होते. त्यांनी थेट बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भोईर यांना 33 हजार मतं पडली होती. या मतदारसंघात शिंदे गटाचे महेंद्र दळवी विजयी झाले. दिलीप भोईर अलीबागमधील भाजप नेते होते. परंतु, त्यांनी निवडणूक काळात बंडखोरी केली होती.
हिंदी भाषा सक्ती प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांना कायदेशीर नोटीस, ७ दिवसात उत्तर न दिल्यास…
या घडामोडीनंतर भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तेव्हापासून भोईर राजकीय वनवासात होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. पक्षांतराला वेग आला आहे. यातच भोईर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे या भागात शिंदेसेनेची राजकीय ताकद वाढणार आहे.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Maharashtra Local Body Elections) शिवसेनेला भोईर यांचा निश्चितच फायदा होणार आहे. शेतकरी कामगार पक्षाची या भागात ताकद आहे. परंतु, ही ताकद सातत्याने कमी होत चालली आहे. अशात शिंदेंच्या शिवसेनेच्या रुपात मोठी शक्ती या भागात तयार होऊ लागली आहे. त्यामुळे शेकापसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे.