ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी काय दिली प्रतिक्रिया?

  • Written By: Published:
ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी काय दिली प्रतिक्रिया?

Sharad Pawar Reaction on Anil Deshmukh Attack  : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यातील एक दगड देशमुखांच्या डोक्याला लागल्याने ते जखमी झाले. (Anil Deshmukh) त्यामुळे या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. देशमुख हे उपचारासाठी नागपूर येथे आले आहेत. दगडफेक करणारे भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी भाजपच्या घोषणा देऊन गाडीवर दगडफेक केल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुख महाराष्ट्राचे आणि विशेषत: विदर्भाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर दगडफेक करणं किंवा हल्ला करणं, असा प्रकार होईल, अशी चर्चा आम्ही यापूर्वी तिथं ऐकली होती. आम्ही या घटनेचा निषेध करतो, अशा शब्दांत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

Video: अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर पोलिसांची प्रतिक्रिया; तपास करण्याबद्दल दिली माहिती

प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.‌ ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

काय घडलं?

काटोल मतदारसंघात अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख हे रिंगणात आहेत. अनिल देशमुख हे सलील यांच्या प्रचारासाठी जलालखेडा परिसरातील नरखेड तालुक्यातील एका गावात गेले होते. परत येत असताना अचानक त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. वाहनाच्या काचा उघड्या असल्याने एक दगड त्यांच्या डोक्याला लागला आहे. रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube