भाजपाचे ठाकरे-राऊतांना उत्तर; म्हणाले, राऊत साहेब तुम्ही ओबीसी समाजाला..
BJP : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशातील राजकारणात खळबळ उडाली. या निर्णयामुळे बॅकफूटवर गेलेल्या विरोधकांना आक्रमक होण्याची संधी मिळाली आहे. राज्यातील विरोधी पक्षांनीही जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रतिक्रिया ट्विट करत मोदी सरकारला घेरले होते. यानंतर भाजपने (BJP) आक्रमक होत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विटद्वारे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Live Blog । “भारताच्या आवाजासाठी लढतोय, कोणतीही किंमत..” राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
काय म्हणाले संजय राऊत ?
संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते, की राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर देश लुटणारे अजूनही मोकळे आहेत व राहुल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकुमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे, लढत राहू, अशी उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया राऊत यांनी ट्विट केली होती.
राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय द्वेष भावनेतून, प्रकाश आंबेडकरांची टीका
त्यानंतर आता केशव उपाध्ये यांनी ट्विट करत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, चोराला चोर म्हणणं हा गुन्हा ठरला आहे या वाक्याचा अर्थ ओबीसी समाजालाही आपण चोर समजता का ? असा प्रश्न उपाध्ये यांनी विचारला आहे. तसेच राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना आपण ओबीसी समाजाचा अपमान करत असल्याचे उपाध्ये म्हणाले.
राऊत साहेब चोराला चोर म्हणण गुन्हा ठरला आहे या आपल्या वाक्यांचा अर्थ ओबीसी समाजाला आपणही म्हणजे उध्दव ठाकरे व संजय राऊत चोर समजतात का? कारण @RahulGandhi यांनी सर्व मोदी चोर असं विधान केल आहे, म्हणून त्यांना शिक्षा झाली. त्याच समर्थन आपण करत आहात. ओबीसी समाजाचा अपमान आपण करत आहात. https://t.co/bl10KxTzXD
— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 24, 2023
नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात? असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलारमध्ये केलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. यावर सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. कोर्टाने राहुल गांधींना दोषी ठरवले व त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. दरम्यान राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला असून त्यांना जामीनही मंजूर झाला आहे.