काय सांगता! लाडकी बहीण योजनेत लाडके भाऊ, 14 हजार पुरुषांनी घेतला लाभ; वसुली होणार..

Ajit Pawar : राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. योजना फक्त महिलांसाठी असताना या योजनेत चक्क पुरुष लाभार्थी सापडले आहेत. जवळपास 14 हजार 218 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेंतर्गत या पुरुष लाभार्थ्यांना 21.44 कोटी रुपयांचे वाटपही झाले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अशा बोगस लाभार्थ्यांकडून पैसे वसूल केले जातील. जर त्यांनी सहकार्य केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिला.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार पुढे म्हणाले की, ‘ज्या गरिब महिला आहेत त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू आहे. त्याच्यात मधल्या काळात पण तुम्ही पाहिलं, काही महिला ज्या सरकारी नोकरी करत होत्या त्यांची पण नावं आली. जसं जसं एक-एक गोष्ट लक्षात येत आहे तसतशी आम्ही ती नावं कमी करत आहोत. या योजनेमध्ये पुरुष लोकांची नावं येण्याचं काहीच कारण नाही. ही योजना पुरुषांसाठी नव्हती. जर या योजनेत पुरुषांची नावं आलेली असतील तर, ते पैसे आम्ही वसूल करू. त्यांनी जर सहकार्य केलं नाही तर, लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यास मागेपुढे पाहाणार नाही’, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला आहे.
महत्वाची बातमी! नो चाळण, नो गाळण, लाडकी बहीण योजनेची पडताळणी थांबवण्याचा सरकारचा निर्णय
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिना दीड हजार रूपये सरकारतर्फे जमा करण्यात येतात. ही योजना अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठीच सुरू करण्यात आली होती. याव्यतिरिक्त योजनेच्या लाभार्थ्यांसाठी इतरही काही अटी घालण्यात आल्या होत्या. परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी बऱ्याच महिलांनी या अटींचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. आता अशा लाभार्थी महिलांची नावं योजनेतून वगळण्याचं काम सुरू आहे.
सरकारी कर्मचारीही लाभार्थी
सरकारी नोकरी असणाऱ्या महिलांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेत असल्याचे पडताळणीमध्ये समोर आलंय. अडीच लाख कुटुंब उत्पन्नाची अटही बऱ्याच महिलांनी पाळली नाही. या योजनेचा लाभ एका कुटुंबातील दोनच महिलांना देण्यात येतो. मात्र काही ठिकाणी एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला योजनेचा लाभ घेत असल्याचं आढळून आलं आहे. ही योजना 65 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या महिलांसाठी आहे, कारण 65 पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना सरकार इतर योजनेअंतर्गत लाभ देतं. परंतु 65 पेक्षा जास्त वयाच्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. सरकार आता पडताळणीद्वारे अशा अपात्र महिलांची नावं योजनेतून कमी करत आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे शेतकरी कर्जमाफीस विलंब; सरकारच्या मंत्र्यानच दिली आतली बातमी