‘ब्रँड मोदी’ महाराष्ट्रात फेल! 17 मतदारसंघात PM मोदींच्या सभा; फक्त तिघेच विजयी..

‘ब्रँड मोदी’ महाराष्ट्रात फेल! 17 मतदारसंघात PM मोदींच्या सभा; फक्त तिघेच विजयी..

Maharashtra Lok Sabha Election Result : महाराष्ट्रात यंदा महायुतीची पिछेहाट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्माही (PM Narendra Modi) महायुतीला तारू शकला नाही. आजपर्यंत ज्या मोदी ब्रँडच्या नावावर निवडणुकीत भाजपाचा वारू चौफेर उधळत होता त्याला लगाम घालण्याचं काम महाराष्ट्रात झालं. महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका (Maharashtra) बसला. भाजपला तर दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. 2019 च्या निवडणुकीत भाजपने 23 जिंकल्या होत्या. यंदा फक्त 9 जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात धुवाधार प्रचार केला. मोठमोठ्या सभा घेतल्या, रणरणत्या उन्हात रॅल्या काढल्या. लाखोंची गर्दी जमली. पण, विजयाची माळ उमेदवारांच्या गळ्यात काही पडली नाही. पंतप्रधान मोदींनी राज्यात 17 सभा घेतल्या यातील फक्त 3 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांनी प्रचाराची तयारी केली. भाजपही यात मागे नव्हता. स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. ज्या राज्यांत जास्त फटका बसण्याची शक्यता होती त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. यात महाराष्ट्रही होता. येथे फटका बसू शकतो यांचा अंदाज भाजपाच्या धुरिणांना होता. त्यामुळे राज्यातील स्थानिक नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सभांचा कार्यक्रम आखण्यात आला.

17 सभा विजयी फक्त तिघेच, मोदींचा स्ट्राईक रेट घसरला

पंतप्रधान मोदींनी तर राज्यात धुवाधार प्रचार केला. प्रचार सभांत केंद्र सरकारच्या योजनांचा उल्लेख केला.  मोदी की गॅरंटीचं नाण खणखणीत वाजवलं. प्रसंगी मतदारांना विनंतीही केली. कधी जोशात तर कधी आक्रमक होत प्रचार केला. पण, मोदी ब्रँड चाललाच नाही. मतमोजणीनंतर जेव्हा निकाल हाती आले तेव्हा पंतप्रधान मोदींनी ज्या सतरा मतदारसंघात प्रचार केला होता त्यातील तब्बल 14  मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पराभूत झाले होते. फक्त तीन मतदारसंघातील उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला.

नितीश-नायडूंच्या सौदेबाजीनं वाढली मोदी-शहांची डोकेदुखी; TDP कडून ‘या’ 5 मंत्रालयांची मागणी

चंद्रपुरात मंत्रीच पराभूत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपुरात प्रचार सभा घेतली होती. येथील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. रामटेक मतदारसंघातही मोदींनी सभा घेतली होती. येथ शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंना मतदारांनी नाकारलं. मराठवाड्यात भाजपवर प्रचंड नाराजी होती. मोदींच्या सभेतूनही नाराजी कमी झाली नाही. परभणीत मोदी प्रचाराला आल्यानंतरही राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरांचा पराभव रोखता आला नाही.

नांदेड मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची ताकद भाजपला मिळाली होती. मोदींच्या सभेनं महायुतीला आणखी बळ मिळालं. पण, निवडणूक निकाल आले तेव्हा प्रतापराव चिखलीकर पराभूत झाले होते. सोलापूर मतदारसंघात भाजपनं जोरदार फिल्डिंग लावली होती. महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी प्रचारही जोरात केला त्यांच्या मदतीला नंतर मोदींची सभाही झाली. मात्र या मतदारसंघात काँग्रेसची ताकद दिसून आली.

बारामतीत सुप्रिया सुळेंची हॅट्ट्रीक

महाराष्ट्रासह देशाचं लक्ष बारामती मतदारसंघावर होतं. कारण येथे पवार कुटुंबातील सदस्य रिंगणात होते. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार उभ्या होत्या. त्यांच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. बारामतीत जंगी सभा झाली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हजर होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सभा घेतली. पण, या कशाचाच उपयोग झाला नाही. शरद पवारांचंच नाव येथे चाललं. सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा खासदार म्हणून  निवडून आल्या.

फडणवीसांनी सूडाचं, जाती-धर्माचं राजकारण सुरु करुन राज्य रसातळाला नेलं -राऊत

धाराशिव मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठीही पीएम मोदींनी सभा घेतली. तसेच नगर दक्षिण मतदारसंघातील सुजय विखे, बीडमध्ये पंकजा मुंडे, नंदूरबारमध्ये हिना गावित आणि दिंडोरीत डॉ. भारती पवार या महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींनी प्रचार केला. सभा घेतल्या. मात्र तरीही या उमेदवारांचा पराभव काही रोखता आला नाही. पंतप्रधान मोदींनी सभा घेतलेल्या तीन मतदारसंघांत मात्र महायुतीचे उमेदवार विजयी झाले. यामध्ये सातारा, पुणे आणि कल्याण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजयी झाले. 

दरम्यान, महाराष्ट्रात इतकं मोठं अपयश पदरी का पडलं? नेमकं चुकलं तरी कुठं? मोदींचा करिश्मा फेल कसा झाला या प्रश्नांचा शोध आता घेतला जात आहे. राज्यातील राजकारण बदललेली परिस्थिती, शेतकऱ्यांचा रोष यांसह अन्य कारणांमुळं गणित बिघडलं का याचाही शोध घेण्यासाठी भाजप नेत्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. या सगळ्या बैठकांतून भाजप आणि महायुतीच्या पराभवाची काय कारणं समोर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube