‘जरांगेंनी कितीही आरोप केले तरी मराठा समाज माझ्या मागे उभा’ : फडणवीसांनी सांगितलं कारण

‘जरांगेंनी कितीही आरोप केले तरी मराठा समाज माझ्या मागे उभा’ : फडणवीसांनी सांगितलं कारण

Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या आरोपांचे आणि चिघळलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटत आहे. जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिले. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.

एसआयटी गठीत करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी जे निर्देश दिले आहेत त्याचे पालन होईल. मला आज या विषयावर बोलायचं नव्हतं. पण बोलावं लागत आहे. मराठा समाजाला आरक्षण खरंतर माझ्याच कार्यकाळात दिलं गेलं होतं. आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले. मी मुख्यमंत्री असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही टिकवलं. या संपूर्ण काळात सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असे अनेक उपाय केले आणि त्याचा लाभ मराठा समाजाला झाला आणि आजही होतो आहे. त्यामुळेच संपूर्ण मराठा समाज माझ्या मागे उभा राहिला आणि आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Manoj Jarange : चौकशा करा, मी सुद्धा आता सगळं उघड करतो; SIT चौकशीवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

कुणाकडे बैठक झाली, कुणी दगडफेक करायला सांगितली, ते आता आरोपी सांगत आहेत. या संपूर्ण प्रकारात बीडच्या घटना कशा विसरता येतील? तुम्ही राजकारण कुठल्या पातळीला घेऊन निघाले आहात? कुणाचे कार्यकर्ते आहेत? कोण पैसे देत आहे? हे सारे समोर येते आहे आणि येईलच. मला जरांगे यांच्यावर काहीच बोलायचं नाही. पण त्यांचा बोलविता धनी कोण? हे शोधून काढले जाईल. छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईत वॉररूम कुणी सुरू केल्या? हेही तपासात पुढे येत आहे. एक नक्की हे संपूर्ण षडयंत्र पुढे आणले जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube