Ajit Pawar : सरकारने काय-काय केलं बंद ? ; संतापलेल्या अजितदादांनी सभागृहात यादीच वाचली

24_10_2019 Ajit Pawar_19696689

मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात विरोधक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी सरकारकडून सुरू असलेल्या नियमबाह्य कामकाजावर हल्लाबोल केला. अलीकडच्या काळात विधीमंडळातील बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना बगल देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला. सरकारने कोणकोणते कामकाज बंद केले याची माहिती देत यामध्ये तत्काळ सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली.

सदस्यांनी विधीमंडळात सादर केलेल्या सूचना मान्य किंवा अमान्य याची माहिती सदस्यांना मिळत नाही. कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना दिली जात नाही.तसेच ही यादी कार्यवाहीसाठी मंत्रालयीन विभागांना पाठवली की नाही याची माहिती देण्यात यावी. ‘ऑर्डर ऑफ द डे’ रात्री बारा वाजेनंतर वेबसाइटवर देण्यात येत असल्याने दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाची माहिती सदस्यांसह मंत्र्यांना सुध्दा मिळत नाही. यामध्ये तत्काळ सुधारणा करुन सभागृहाच्या नियम, प्रथा-परंपरांचे योग्य प्रकारे पालन करण्याची मागणीही अजित पवार यांनी केली.

वाचा : व्हीपच्या भांडणावर उदय सामंत स्पष्टच बोलले; म्हणाले, व्हीप फक्त.. 

विधिमंडळ सदस्य अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीने आपल्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तारांकित प्रश्न, कपात सूचना दाखल करत असतात. विधीमंडळ सचिवांनी या सूचना मान्यतेसाठी सादर केल्यानंतर सूचना मान्य झाली किंवा अमान्य झाली, हे कळण्याचा सदस्यांचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु गेल्या काही काळापासून ही परंपरा पाळली जात नाही.

चहात सोन्याचे पाणी टाकून पिता का ? ; सरकारच्या कोट्यावधींच्या चहापानावर अजित पवार संतापले

विधानसभा सदस्यांनी दाखल केलेला तारांकित प्रश्न स्वीकृत झाला किंवा अस्वीकृत झाला याबाबतची माहिती संबंधित सदस्यांना सचिवालयाकडून देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे.संबंधित विभागांच्या मागण्या मतदानासाठी ज्यादिवशी कामकाज पत्रिकेत दाखविलेल्या असतात त्याचदिवशी अध्यक्षांनी मान्य केलेल्या कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना टपालाद्वारे प्राप्त व्हायची. परंतु, सदस्यांना कोणतीही माहिती न देता कपात सूचनांची एकत्रित यादी पाठविणे बंद करण्यात आले आहे.हिवाळी अधिवेशनातील मान्य झालेल्या कपात सूचनांची यादी आजतागायत पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयीन विभागांना आणि सदस्यांना पाठविण्यात आलेली नाही.

विधिमंडळ सदस्यांना ‘ऑर्डर ऑफ द डे’ आल्यानंतर आपली लक्षवेधी सूचना किंवा प्रश्नोत्तराच्या यादीत प्रश्न छापून आलेला दिसला तर सदस्यांना त्या प्रश्नावरील पूरक प्रश्नाची तयारीही करता येत नाही. मात्र रोजची ‘ऑर्डर ऑफ द डे’ सुद्धा रात्री १२ नंतर उशिरा वेबसाइटवर टाकली जाते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोणते कामकाज आहे. हे सदस्यांना कळत नाही.केवळ सदस्यच नाही तर मंत्र्यांना आणि विभागांना देखील त्या विषयावर संपूर्ण माहितीसह सभागृहात येण्यास अडचणीत येतात. तरी ‘ऑर्डर ऑफ द डे’ रात्री किमान दहा वाजेपर्यंत वेबसाइटवर टाकण्याची मागणी पवार यांनी केली. यावर योग्य ती सुधारणा करण्याचे आश्वासन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

follow us