शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांचं विधान अन् चर्चांना उधाण

शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांचं विधान अन् चर्चांना उधाण

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आताच केलेल्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष एकवटतील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवार यांनी (Sharad Pawar) एका मुलाखतीत केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. याआधी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील दोन पक्ष लोप पावतील असे सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर शरद पवार यांनी असे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार अन् भाजप नेत्यात फोनवर चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

शरद पवार पुढे म्हणाले, पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत राहून चांगल्या समन्वयाने काम करतील. यातील काही प्रादेशिक पक्ष त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लागू होत नाही का असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, मला राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात कोणताच फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची विचारसरणी मानणारे आहोत.

आता आमच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार का याबाबत माझ्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेस पक्षाच्या अधिक जवळ आहोत. असे असले तरी आगामी काळातील रणनिती पक्षातील सहकारी यांच्याबरोबर चर्चा करून एकत्रितपणे ठरण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचनी पडणे आमच्यासाठी कठीण आहे, असे  शरद पवार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

देशातील प्रादेशिक पक्ष आणि या पक्षांच्या दुसऱ्या पिढीतील नेत्यांचा सत्तेकडे असलेला झुकाव पाहता शरद पवारांनी हे वक्तव्य केलं. राज्यांतील या पक्षांच्या नेत्यांच्या मुलांपर्यंत भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे आरोप होत आहेत. या पार्श्वभुमीवर एका व्यापक विचारातून हे पक्ष एकाच छताखाली येऊन पुढील लढाई लढतील असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं? अजितदादांनी शरद पवारांना थेट विचारलं

यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबाबतही शरद पवार यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे समविचारी पक्षांबरोबर काम करण्यास सकारात्मक असतात. मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे ती आमच्यासारखीच आहे असे शरद पवार यांनी द इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube