live now
Sharad Pawar Retirement Live : पवारांनी निर्णय मागे घेण्याचा कोणताही विचार केलेला नाही- प्रफुल्ल पटेल
NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेच यांचीच वर्णी लागेल, अशी माहिती समोर येत आहे.
सुप्रिया सुळे यांना पक्षाध्यक्ष होण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू आहे. अजित पवार यांचं कथित नाराजी नाट्य सुरू असतानाच पक्षाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, अशी माहिती आता समोर येत आहे.
Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप
शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला नाही तर राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी थेट विभागणी पक्षात केली जाण्याची शक्यता आहे. सुळे यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव आधीच झाली होती. लवकरच निवडणूक आयोगाला याबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या पक्षाच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब केले जाण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. सुप्रिया सुळे यांनी अध्यक्ष होण्यास काहीच अडचण नाही. कामाची विभागणी आधीच झाली आहे. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी विभागणी झाली आहे. त्यांचे लोकसभेत काम आहे. त्यामुळे त्या अध्यक्ष होण्यात काहीच अडचण नाही, असे भुजबळ म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या 26 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्या राजीनाम्याची चर्चा झाली होती. तर शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या बैठकीत पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
पवारांनी निर्णय मागे घेण्याचा कोणताही विचार केलेला नाही- प्रफुल्ल पटेल
शरद पवारांनी निर्णय मागे घेण्याचा कोणताही विचार केलेला नाही, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे. शरद पवार नेहमीप्रमाणे वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये आले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही बैठक झालेली नाही. बैठकीबद्दल मी अधिकृत स्वतः सांगणार आहे. सुप्रिया यांच्याबद्दलच भुजबळांचे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. कुणाच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाही. सुप्रिया अध्याक्षा होणार हे सर्व अंदाज आहेत. सिल्वर ओकवर आज संध्याकाळी 5 वाजता बैठक होईल असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे. पक्षामध्ये सर्व लोक एकत्र आहेत. पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही एकत्र आहोत. पक्षामध्ये काहीही गडबड होणार नाही. सर्व कार्यकर्त्यांनी धीर ठेवावा, असे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असून पक्षामध्ये कोणतीही फूट नाही. कारखान्याच्या बैठकीसाठी जयंत पाटील पुण्यात गेले होते. संध्याकाळच्या बैठकीला ते हजर राहणार आहेत. जयंत पाटील नाराज नसल्याचे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले आहे.
-
देशभरातील राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या भेटीला
देशभरातील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेत आहेत. भेटीत कार्यकर्त्यांशी पवार चर्चा करीत असल्याचंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.शरद पवारांनी सांगितल्यानुसार राजीनाम्याच्या निर्णयावर ते एक ते दोन दिवस विचार करीत आहेत. पुढील एक दोन दिवसांत शरद पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पुढची रणनीती काय असणार? हे स्पष्ट होणार आहे. पक्षाचे नेते जयंत पाटील आज मुंबईत नसल्याचं त्यांनी सांगितलंय.ते आल्यानंतरच निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
-
आज संध्याकाळी होणार बैठक, मीही हजर राहणार - पाटील
सुप्रिया सुळे यांच्याबरोबर माझे बोलणे झाले आहे. आज कोणताही बैठक आयोजित केलेली नव्हती. आज संध्याकाळी ५ वाजता बैठक होणार आहे, तिथे मी उपस्थित राहणार आहे. पवार साहेबांमुळे पक्ष वाढला आहे, त्यांनी निर्णय बदलावा अशी मागणी आम्ही करत आहोत. शरद पवार यांच्या निवृत्तीचं कारण अजूनही स्पष्ट नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
-
मला बैठकीला बोलवण्याची गरज वाटली नसेल - पाटील
जयंत पाटील यांना आजच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यावर पाटील म्हणाले, की मला बैठकीला बोलवण्याची गरज वाटली नसेल. प्रत्येक ठिकाणी आपण असलचं पाहिजे, असा आग्रह आपण करु नये. मी पक्षावर नाराज नाही व पक्षदेखील माझ्यावर नाराज नाही.
-
समितीची कोणतीही बैठक झाली नाही - भुजबळ
शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आज समितीची कोणतीही बैठक आयोजित केली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फक्त चर्चा करत होते, बाकी काही नाही असे स्पष्टीकरण आमदार छगन भुजबळ यांनी बैठक होणार असल्याच्या चर्चांवर दिले.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटलांचा राजीनामा ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राजीनामा सत्र सुरू झाले आहे. जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्यानंतर आणखी एका नेत्याच्या राजीनाम्याची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.
-
शरद पवारांनी राजीनामा देऊ नये - आव्हाड
शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये. याच मागणीवर आम्ही कालपासून ठाम आहोत. बाकी काय घडामोडी सुरू आहेत ते मला माहिती नाही.
-
राष्ट्रवादी काँग्रेस समितीची बैठक संपली, आव्हाडांचा प्रसारमाध्यमांशी संवाद
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी नियुक्त समितीची बैठक संपली. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद
-
शरद पवार सूचना देतील तसाच पक्ष चालणार - भुजबळ
शरद पवार अध्यक्षपदावर असले आणि नसले तरीही ते सूचना देतील त्यावर पक्ष चालणार आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही कमिटी आहे, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. अद्याप या कमिटीची बैठक झालेली नाही. अगदीच नाईलाज झाला तर कमिटीची बैठक बोलावण्यात येईल आणि निर्णय घेतला जाईल.
-
जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा; पवारांच्या निवृत्ती घोषणेनंतर मोठा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटनीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी आव्हाडांनी राजीनामा दिला आहे. पवारांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आव्हाडांसह ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.