महानोरांच्या निधनाने ग्रामीण साहित्याचा आवाज हरपला; राजकीय नेत्यांकडून हळहळ!

महानोरांच्या निधनाने ग्रामीण साहित्याचा आवाज हरपला; राजकीय नेत्यांकडून हळहळ!

N D Mahanor Passed Away : ज्येष्ठ कवी साहित्यिक ना. धों. महानोर यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनीक येथे उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ना. धों चे बालपण कष्टात गेले पण, कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. ना. धों. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे .

 

मराठी मातीतला रानकवी हरपला – मुख्यमंत्री शिंदे

मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

महानोरांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची हानी – अजित पवार

ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पवार कुटुंबियांनी घनिष्ठ मित्र गमावला आहे. महानोर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ना. धों. महानोर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.

 

मराठी साहित्याला वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यि हरपला -फडणवीस

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाला रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केलं. लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केले. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले. हि आम्हा सर्वांसाठी व्यक्तिगत हानी आहे. महानोरांनी खऱ्या अर्थाने मराठी साहित्यात बालकवी आणि बहिणाबाई यांचा समृद्ध वारसा जीवंत ठेवला. कवितेतून माती,शेती आणि संस्कृतीची नवी ओळख करुन दिली. त्यांच्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘रानातल्या कवितां’ आदी अनेक रचना अजरामर आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त म्हणून देखील काम पाहिले. त्यांच्या निधनामुळे साहित्याला मातीशी जोडून ठेवणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला.या कठिण प्रसंगी आम्ही सर्वजण महानोर कुटुंबियांसोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube