Mahesh Elkunchwar : ‘वर्षातून एकदाच साहित्य संमेलनावर २-३ कोटी खर्च करणं चुकीचं, त्यापेक्षा….’
Mahesh Elkunchwar : दरवर्षी होणारी मराठी साहित्य संमेलनं ही मराठी माणसांसाठी एक विचारांची पर्वणीच असते. मात्र, आता ज्येष्ठ लेखक आणि नाटककार महेश एलकुंचवार यांनी वर्षातून एकदाच साहित्य समेलनांवर दोन-तीन कोटी रुपये खर्च करणं चुकीचं असल्याचं वक्तव्य केलं. (Mahesh Elkunchwar On marathi sahitya sammelan they said It is wrong to spend two three crore rupees on literature conferences once a year)
अळमनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन नागपुरात करण्यात आले. त्यावेळी बोलतांना एलकुंचवार यांनी साहित्य संमेलनाबाबतही आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, वर्षातून एकदाच साहित्य संमेलनावर २-३ कोटी खर्च करणे चुकीचे आहे असे मला वाटते. त्याऐवजी तीन-चार महत्वाच्या लेखकांना निमंत्रित करून दर महिन्याला तीन दिवसांचा कार्यक्रम कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात एका ठिकाणी आयोजित केला पाहिजे. तसं केलं तर बरे होईल. कारण, त्यासाठी पैसेही कमी लागतील. लेखकांसोबत स्थानिक लोकांचे आदानप्रदान जास्त होईल आणि त्याचं स्वरुप गंभीर राहिल, असं मत एलकुंचवार यांनी व्यक्त केलं.
14 मजल्याचे घर बांधून संपत्तीचे प्रदर्शन करणं लाजीरवाणे; महेश एलकुंचवारांची अंबानींवर टीका
यावेळी एलकुंचवार यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावरही टीका केली. अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. ऐशआरामत जीवन जगणाऱ्या अंबानीचं अँटिलिया घर प्रचंड महागड्या किमतीचं आहे. यावरूनच एलकुंचवारांनी त्यांच्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, आपल्या देशातील, बिर्ला, अदानीसारखे लोक मोठमोठाली मंदिरं बांधतात. मुकेश अंबानींचे घर तर लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यांनी 14 मजली घर बांधलं आहे. संपत्तीचे असं प्रदर्शन करणं हे सुसंकृतपणाचं लक्षण नाही. पण या माणसांकडून आपण अपेक्षाच करायची नाही. बदलात मध्यमवर्ग नेहमीच आघाडीवर राहिला आहे. पण, गेल्या 30-40 वर्षांत मध्यमवर्ग या परंपरेचा विसर पडला आहे, असंही एलकुंचवार म्हणाले.