एकाच तिकिटावर तोच-तोच पिक्चर पुन्हा दाखवता येणार नाही; आमदार विक्रम पाचपुते यांचा थेट इशारा
भाजपचे आमदार आणि महानगरपालिका निवडणूक सहप्रभारी विक्रम पाचपुते यांनी केलेल्या स्पष्ट आणि थेट विधानामुळे महायुतीतील अंतर्गत हालचालींना वेग.
MLA Vikram Pachpute’s suggestive warning about alliances : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच महायुतीच्या(Mahayuti) राजकारणात(Politics) एक मोठं आणि निर्णायक वळण निर्माण झालं आहे. भाजपचे(BJP) आमदार आणि महानगरपालिका निवडणूक सहप्रभारी विक्रम पाचपुते(MLA Vikram Pachpute) यांनी केलेल्या स्पष्ट आणि थेट विधानामुळे महायुतीतील अंतर्गत हालचालींना वेग आला असून, स्थानिक पातळीवरच नव्हे तर प्रदेश पातळीवरही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. या मुलाखतीदरम्यान महायुती होणार की नाही, या प्रश्नावर त्यांनी कोणतीही संदिग्ध भूमिका न घेता थेट इशाराच दिला. “एकाच तिकिटावर तोच-तोच पिक्चर पुन्हा दाखवता येणार नाही,” असं स्पष्टपणे सांगत त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची भूमिका किती ठाम आहे, हे अधोरेखित केलं.
पाचपुते यांनी यावेळी हेही स्पष्ट केलं की, ज्या-ज्या नगरपालिकांमध्ये भाजपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवून यश मिळवलं आहे, तेच निकष पुढील महानगरपालिका निवडणुकांमध्येही लागू केले जातील. म्हणजेच, केवळ युतीच्या नावाखाली जुन्याच फॉर्म्युल्यावर पुन्हा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. उद्याच्या नगरपालिकेच्या निकालानंतर सखोल सर्वे केला जाईल आणि त्यानंतरच प्रदेश पातळीवर महायुतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
महापालिका निवडणुकांची घोषणा! दुबार मतदार अन् चुकीचा पत्ता, निवडणूक आयोगाने काय दिलं स्पष्टीकरण?
या विधानामुळे महायुतीतील इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि धाकधूक वाढली आहे. काही जागांवर भाजप स्वतंत्रपणे ताकद आजमावण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आता जोर धरू लागली आहे. विशेषतः, स्थानिक पातळीवर भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असल्याचा दावा पक्षाकडून केला जात असून, त्या जोरावर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन असल्याचे संकेत पाचपुते यांच्या वक्तव्यातून मिळतात.
नगरपालिकेच्या निकालानंतर अहिल्यानगरच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुती पूर्वीप्रमाणे टिकणार का, की काही ठिकाणी तुटून स्वतंत्र राजकीय रणशिंग फुंकलं जाणार?, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. भाजप स्वतंत्रपणे मैदानात उतरणार का, की युतीतच नव्या अटी-शर्तींसह वाटचाल होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
एकंदरीत, विक्रम पाचपुते यांच्या या स्पष्ट आणि थेट भूमिकेमुळे महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापलं असून, उद्याच्या निकालानंतर अहिल्यानगरच्या राजकारणाला नेमकी कोणती दिशा मिळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
