लातूर जिल्ह्यात दुर्मिळ आणि अमानुष हत्याकांड; कारमध्ये बांधून ठेवत रिकव्हरी एजंटला जिवंत जाळले
एका व्यक्तीला पोत्यात बांधून कारमध्ये टाकण्यात आले आणि त्यानंतर त्या कारला आग लावून जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर.
Recovery agent burned alive while tied up in car : लातूर(Latur) जिल्ह्यातील औसा तालुक्यात एक अत्यंत खळबळजनक आणि अमानुष हत्याकांड(Murder) उघडकीस आले असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. औसा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या वानवाडा रोड परिसरात एका व्यक्तीला पोत्यात बांधून कारमध्ये टाकण्यात आले आणि त्यानंतर त्या कारला आग लावून जिवंत(Burn Alive) जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही भीषण घटना 14 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घडली. आगीचा भडका इतका प्रचंड होता की संपूर्ण कार काही वेळातच जळून खाक झाली. कारच्या आत असलेल्या व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आगीची तीव्रता इतकी होती की मृतदेह अत्यंत खराब अवस्थेत आढळून आला आणि अनेक वेळ आग धुमसत राहिली. त्यामुळे मृताची ओळख पटवणे सुरुवातीला अत्यंत कठीण ठरले. घटनेची माहिती मिळताच औसा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत गाडी पूर्णतः जळून गेली होती. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आणि नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.
मोठी बातमी! प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर?, प्रियंका गांधींची घेतली भेट
तपासादरम्यान घटनास्थळी आढळलेली जळालेली कार हा पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरली. कारच्या नंबर प्लेटच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली. त्या आधारे हे वाहन औसा तांडा परिसरातील असल्याची माहिती समोर आली. यानंतर पहाटे सुमारे 3:30 वाजता पोलिस पथक औसा तांडा येथे पोहोचले. वाहन मालक आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली, त्यातून मृत व्यक्तीची ओळख पटली. प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव गणेश चव्हाण असून तो एका फायनान्स कंपनीत रिकव्हरी एजंट म्हणून कार्यरत होता. गणेश चव्हाण यांना प्रथम पोत्यात बांधण्यात आले, त्यानंतर कारमध्ये कोंबण्यात आले आणि नंतर त्या कारला आग लावण्यात आली, असा गंभीर आरोप आहे. या घटनेमागे अपघात नसून सुनियोजित कट असल्याचा पोलिसांना संशय आहे.
गणेश चव्हाण यांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आर्थिक व्यवहार, फायनान्स रिकव्हरीशी संबंधित वाद, खंडणी किंवा इतर कोणत्यातरी गंभीर गुन्हेगारी कटाच्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. औसा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन केले जाण्याची शक्यता आहे. या अमानुष हत्याकांडानंतर औसा तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
