ब्रेकिंग : राज्यात पालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं; 15 जानेवारीला मतदान 16 जानेवारीला मतमोजणी
Maharashtra Municipal Corporations Election मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुलं अखेर वाजलं
Maharashtra Municipal Corporations Election Dates Announced : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुलं अखेर वाजलं असून, राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार (Maharashtra Election Commission) परिषद घेऊन महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार मतदान 15 जानेवारी 2026 आणि मतमोजणी 16 जानेवारी रोजी पार पडणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये नामनिर्देशन पत्र ऑफलाईन घेतले जातील, राखीव जागांवर ज्यांना निवडणुक लढवायची आहे त्यांना सहा महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र सादर करावे लागणार, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरली जाईल. नावं जोडण आणि वगळ याचा अधिकार आम्हाला नाही. मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदींना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी रॅम्पची व्यवस्था नसल्यास तात्पूर्ती सुविधा उभारली जाईल. व्हिलचेअरचीही व्यवस्था असेल. मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा असणे आवश्यकच असेल; परंतु याशिवाय शक्य असेल तिथे आदर्श मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न असेल. महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी- कर्मचारी व पोलिस कर्मचारी महिला असतील, असे मतदान केंद्र ‘पिंक मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जाईल. मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाईल दूरध्वनी नेण्यास बंदी असेल.
मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई महापालिकेसाठी 10 हजार 111 मतदान केंद्र असतील. संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे. 11 लाख दुबार मतदारांची नोंद सापडली आहे. मताधिकार हे अॅप तयार केलं आहे, त्यावर माहिती कळणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी पूर्ण सुविधा असेल. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच पाणी, विज, सावली, हे सगळ उपलब्ध असेल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 290 लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रचार कालावधी संपल्यानंतर सोशल मीडिया आणि मुद्रीत माहिती प्रसारीत करता येणार नाही. 48 तास अगोदर प्रचार संपणार आहे. राजकीय पक्षांसोबत बैठका घेऊन त्यांच्या सुचनाही विचारात घेणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
महापालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे – 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
अर्जाची छाननी – 31 डिसेंबर
उमेदवारी माघारीची मुदत – 2 जानेवारी
चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – 3 जानेवारी
मतदान – 15 जानेवारी
निकाल – 16 जानेवारी
मतदार व मतदान केंद्र
⦁ पुरुष मतदार- 1,81,93,666
⦁ महिला मतदार- 1,66,79,755
⦁ इतर मतदार- 4,596
⦁ एकूण मतदार- 3,48,78,017
⦁ एकूण मतदान केंद्र- 39,147
भाजपचं धक्कातंत्र कायम! भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारचे नितीन नबीन
कोणत्या 29 महापालिकांच्या निवडणूका होणार
1. अहिल्यानगर महानगरपालिका
2. अकोला महानगरपालिका
3. अमरावती महानगरपालिका
4. भिवंडी निजामपूर महानगरपालिका
5. बृहन्मुंबई महानगरपालिका
6. चंद्रपूर महानगरपालिका
7. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
8. धुळे महानगरपालिका
9. इचलकरंजी महानगरपालिका
10. जळगाव महानगरपालिका
11. जालना महानगरपालिका
12. कल्याण डोंबिवली महानगरपालिका
13. कोल्हापूर महानगरपालिका
14. लातूर महानगरपालिका
15. मालेगाव महानगरपालिका
16. मीरा भाईंदर महानगरपालिका
17. नागपूर महानगरपालिका
18. नांदेड वाघाळा महानगरपालिका
19. नाशिक महानगरपालिका
20. नवी मुंबई महानगरपालिका
21. पनवेल महानगरपालिका
22. परभणी महानगरपालिका
23. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
24. पुणे महानगरपालिका
25. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
26. सोलापूर महानगरपालिका
27. ठाणे महानगरपालिका
28. उल्हासनगर महानगरपालिका
29. वसई विरार महानगरपालिका
महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर 4 नोव्हेंबर 2025 रोजी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातदेखील आदेश निर्गमित केले आहेत.
मुदत समाप्तीच्या महानगरपालिका निहाय तारखा
राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी जालना आणि इचलकरंजी या 2 नवनिर्मित महानगरपालिका आहेत. 5 महानगरपालिकांची मुदत 2020 मध्ये संपली आहे. सर्वाधिक 18 महानगरपालिकांची मुदत 2022 मध्ये संपली होती; तर 4 महानगरपालिकांची मुदत 2023 मध्ये संपली आहे. मुदत समाप्तीची महानगरपालिका निहाय तारखा खालीलप्रमाणे
छत्रपती संभाजीनगर : 27 एप्रिल 2020, नवी मुंबई : 07 मे 2020, वसई- विरार: 28 जून 2020, कल्याण- डोंबिवली: 10 नोव्हेंबर 2020, कोल्हापूर: 15 नोव्हेंबर 2020, नागपूर: 04 मार्च 2022, बृहन्मुंबई: 07 मार्च 2022, सोलापूर: 07 मार्च 2022, अमरावती: 08 मार्च 2022, अकोला: 08 मार्च 2022, नाशिक: 13 मार्च 2022, पिंपरी- चिंचवड: 13 मार्च 2022, पुणे: 14 मार्च 2022, उल्हासनगर: 04 एप्रिल 2022, ठाणे: 05 एप्रिल 2022, चंद्रपूर: 29 एप्रिल 2022, परभणी: 15 मे 2022, लातूर: 21 मे 2022, भिवंडी- निजामपूर: 08 जून 2022, मालेगाव: 13 जून 2022, पनवेल: 9 जुलै 2022, मीरा- भाईंदर: 27 ऑगस्ट 2022, नांदेड- वाघाळा: 31 ऑक्टोबर 2022, सांगली- मीरज- कुपवाड: 19 ऑगस्ट 2023, जळगाव: 17 सप्टेंबर 2023, अहिल्यानगर: 27 डिसेंबर 2023, धुळे: 30 डिसेंबर 2023, जालना: नवनिर्मित आणि इचलकरंजी: नवनिर्मित.
मतदान केंद्र आणि ईव्हीएम
महानगरपालिका निवडणुकांसाठी एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदार असून त्यासाठी सुमारे 39 हजार 147 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 10 हजार 111 मतदान केंद्रांसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
