मराठवाड्यात सोयाबीनच्या बियाणांची मोठी कमतरता; पाण्याची अडचण टँकरवर भागणार का?
जसाजसा पाऊस लांबत जाईल तसतशी काही पिकं लागवड करणं योग्य ठरणार नाही, असं कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे.
पाऊसकाळा सुरू झाल्यापासून आणखी एकही पाऊस झालेला नाही. संपूर्ण मराठवाडा दुष्काळ सदृष्य परिस्थितीमध्ये आहे. (Soybean) मराठवाड्यात गेल्या वर्षी १५ जून पर्यंत ४८ टक्के पेरणी पूर्ण झाली होती. आजघडीला ती केवळ ०.१७ टक्के एवढं आहे. धाराशिव, हिंगोली भागात काही ठिकाणी पाऊस सुरू झाल्याने पेरणी केली गेली आहे. अन्यत्र पाऊसच न झाल्याने विदारक स्थिती आहे. शहरी भागात तर विहिरी आटल्याने पिण्याच्या पाण्याची सारी भिस्त टॅँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे.
मराठवाड्यातील लागवडी योग्य क्षेत्रापैकी ७८ टक्के क्षेत्रावर सोयाबीन आणि कापूस लावला जातो. मात्र, आता कमी कालावधीमध्ये येणारे बियाणे वापरावेत असं सांगण्यात येत आहे. ७ जुलैपर्यंत पाऊस लांबला तर भुईमूग, मूग आणि उडीद ही पिकं घेऊ नयेत असं कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. जसाजसा पाऊस लांबत जाईल तसतशी काही पिकं लागवड करणं योग्य ठरणार नाही, असं कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे.
बीड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट; 14 लघु प्रकल्प कोरडे, 71 प्रकल्प मृतसाठ्यात
सोयाबीनचे २६ लाख १७ हजार हेक्टरावर मराठवाड्यात पेरणी होईल असं गृहीत धरण्यात आलं आहे. या क्षेत्रावर पेरणी करायची झाल्यास सहा लाख ८७ हजार लाख क्विंटल बियाणे लागेल असा अंदाज आहे. यापैकी ५.५० हजार लाख क्विंटल बियाणं पुरविण्यात आलं आहे. या हंगामातही सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणण्याचाच अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी घरात राखून ठेवलेलं बियाणं वापरावेत असं सांगण्यात येत आहे.
खते उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी केंद्र सरकारने ऑनलाईन पद्धतीनेच खते वाटप करा, असे आदेश दिले असल्याने खते मिळत नसल्याची ओरड सर्वत्र आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण संकट येऊ शकतं असा अंदाज असल्याने पिण्याचे सर्व साठे पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. जायकवाडीमध्ये २८ टक्के पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट येणार नाही. या वर्षी किती पाऊस पडतो, यावर सारे ग्रामीण भागातील अर्थकारण अवलंबून असणार आहे असा तज्ञांचा अंदाज आहे.