आधी टीप दिली, नंतर अंत्यविधीलाही हजेरी लावली.. संतोष देशमुखांचा जवळच्यानचं केला घात?
Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग. बीड जिल्ह्यातलं छोटसं गाव. हे गाव याआधीही चर्चेत असायचं पण विधायक आणि लोककल्याणाच्या उपक्रमांनी. पण, 9 डिसेंबर रोजी गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनं मस्साजोग महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे समोर आलं. गावात संतोष अण्णा म्हणून ओळखले जाणारे संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली ते ऐकून महाराष्ट्राचं समाजमन सुन्न झालंय.
या प्रकरणात फरार असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे गजाआड झाले आहेत हे खरंच पण, थांबा आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आलाय. जो व्यक्ती संतोष देशमुख यांचा जवळचा म्हणून सांगितलं जायचं. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांना न्याय मिळण्यासाठी झालेल्या आंदोलनात जो सहभागी झाला होता. इतकंच नाही तर त्यांच्या अंत्यविधीलाही जो हजर होता. त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या व्यक्तीचं नाव सिद्धार्थ सोनवणे. या सिद्धार्थ सोनवणेनं नेमकी कोणती टीप दिली? तो पोलिसांच्या रडारवर कसा आला? त्याला पोलिसांनी कुठून ताब्यात घेतलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ या..
लोकांच्या हाकेला धावून येणारे संतोष अण्णा म्हणून संतोष देशमुख यांची गावात ओळख होती. संतोष देशमुख सलग तीन टर्म सरपंच झाले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक समाजोपयोगी कामं केली. मस्साजोग ग्रामपंचायतीला राज्य शासनाचे पुरस्कारही मिळाले. सहाजिकच सरपंच म्हणून त्यांची लोकप्रियता वाढली. गावातल्या प्रत्येक माणसाशी त्यांचा कनेक्ट होता. सगळं गाव त्यांना मानायचं. पण याच गावातल्या त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं देशमुख यांच्या ठावठिकाणाची टीप दिल्याचं आता समोर येत आहे.
डॉ. वायबसे घडाघडा बोलला अन् घुले-सांगळे अडकले; डॉक्टरची चौकशी ठरली टर्निंग पॉइंट
९ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृतदेह आढळून आला होता. संतोष देशमुख यांचा ठावठिकाणा आरोपींना कसा लागला असा मोठा प्रश्न तपास यंत्रणांना पडला होता. ९ तारखेला दुपारी काही कामानिमित्त संतोष देशमुख बाहेर गेले होते. त्यानंतर ते मस्साजोगच्या दिशेने निघाले होते. डोणगाव फाट्याच्या पुढे त्यांची गाडी आलेली असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांना गाठलं. पण ही इतकी माहिती आरोपींना मिळाली तरी कशी, ही माहिती पुरवणारा नेमका कोण आहे याचा शोध घेतला जात होता.
फरार झाला अन् पोलिसांचा संशय बळावला
दुसरीकडे या हत्येच्या प्रकरणानंतरही सिद्धार्थ सोनवणे हा गावातच थांबला होता. काही माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार सिद्धार्थ सोनवणे हा मयत संतोष देशमुख यांचा निकटवर्तीय सहकारी होता. त्यामुळे त्याच्यावर संशय घेण्याचं काहीच कारण नव्हतं. मात्र बीड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बारकाईने तपास केला. संतोष देशमुख यांचं लोकेशन कुणीतरी जवळच्या व्यक्तीने आरोपींना दिल्याची कुणकुण पोलिसांना याच तपासा दरम्यान लागली. हा लोकेशन देणारा व्यक्ती गावातलाच असल्याचा संशय पोलिसांना आला.
पोलीस तपास करत असल्याची कुणकुण लागताच सिद्धार्थ सोनवणे गावातून फरार झाला. त्यानं थेट मुंबई गाठली. इकडे पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिकच बळावला. गावातून फरार होताच त्याचा नक्कीच काहीतरी रोल आहे याची खात्री पोलिसांना झाली. त्यानुसार तपासाला दिशा मिळत गेली. त्यानुसार पोलिसांनी त्याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी लोकेशन शोधलंच..
इकडे त्यानं थेट मुंबई गाठली. आपलं लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी त्यानं पाच सिमकार्ड वापरली. तरी देखील पोलिसांनी त्याचं लोकेशन शोधून काढलंच. मग वेळ न दवडता सापळा लावण्यात आला. एका मोकळ्या मैदानातील उसाच्या गाड्यावर काम करत असतानाच पोलिसांनी सिद्धार्थ सोनवणेवर झडप घातली. तिथून त्याला उचललं अन् थेट केजला घेऊन आले. न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आता सिद्धार्थ सोनवणेच्या चौकशीतून काय माहिती समोर येणे महत्वाचे ठरणार आहेच. पण, सिद्धार्थ सोनवणेनं आरोपींनी अशी टीप का दिली? त्यामागे कारण काय होतं याचं उत्तर पोलीस तपासातून मिळणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.