मराठवाड्यातील जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या; हिंगोली, बीड, परभणीसह नांदेडमध्ये खळबळ
Marathwada Court Bomb Threat : मराठवाड्यातील चार जिल्हा न्यायालयांना एकाच दिवशी धमकीचे ई-मेल मिळ्याने खळबळ उडाली आहे.
Marathwada Court Bomb Threat : मराठवाड्यातील न्यायव्यवस्था आणि पोलीस (Police) प्रशासनाला सोमवारी धमकीच्या ई-मेलमुळे मोठा धक्का बसला. हिंगोली, बीड, परभणी आणि नांदेड येथील जिल्हा न्यायालयांच्या इमारती बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली. या संदेशांची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित न्यायालयांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून काही ठिकाणी न्यायालयीन कामकाजही थांबवण्यात आले.
हिंगोली जिल्हा पोलिसांना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ई-मेल मिळाला होता. त्यात जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर सोमवारी सकाळपासूनच न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बॉम्बशोधक व नाशक पथक आणि श्वानपथकाने न्यायालयातील विविध कक्ष, पार्किंग परिसर, वकिलांची दालने आणि रेकॉर्ड रूमची तपासणी केली.
बीड जिल्हा न्यायालयात सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे पक्षकार, वकील आणि कर्मचाऱ्यांची वर्दळ सुरू होती. मात्र, सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा आणि काही वेळात स्फोट होणार असल्याचा धमकीचा संदेश प्राप्त झाला. यानंतर न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने मोठा बंदोबस्त तैनात करत न्यायालयाचे कामकाज थांबवले आणि न्यायाधीश, वकील तसेच पक्षकारांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढले.
दुसऱ्याच्या डिग्रीवर स्वतःचं नाव, बीडमध्ये बनावट डॉक्टरचा पर्दाफाश; १८ तासांच्या तपासानंतर अटक
परभणी जिल्हा न्यायालयालाही सोमवारी दुपारी 1.10 वाजता धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. या संदेशात दुपारी 3.11 वाजण्याच्या वेळेचा उल्लेख करण्यात आल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पथक आणि बॉम्बशोधक व नाशक पथक न्यायालय परिसरात दाखल झाले. रेल्वे स्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य न्यायालयाच्या इमारतीची तपासणी सुरू करण्यात आली.
धमकीच्या ई-मेलची माहिती मिळाल्यानंतर परभणी जिल्हा न्यायालयातील कामकाज थांबवण्यात आले. न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी, वकील आणि पक्षकारांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण इमारत आणि परिसराची तपासणी सुरू केली. बॉम्बशोधक व नाशक पथकासह विविध विभागांचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले. न्यायालय परिसरात अचानक वाढवण्यात आलेल्या बंदोबस्तामुळे नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
नांदेड जिल्हा न्यायालयालाही सोमवारी दुपारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाली. खबरदारी म्हणून न्यायालयातील न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्यानंतर पोलिसांची स्पेशल टास्कफोर्स, श्वानपथक आणि बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. न्यायालय शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने या घटनेचा परिणाम परिसरातील वाहतुकीवरही झाला.
न्यायालयातील लोकांना बाहेर काढण्यात आल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गांवर काही काळ वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. न्यायालयातील वकील आणि पक्षकार अचानक बाहेर आल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले. दरम्यान, धमकीचे ई-मेल नेमके कुठून पाठवण्यात आले, याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलीस पथकांकडून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. ई-मेलचा स्रोत आणि आयपी ॲड्रेस शोधण्याचे काम सुरू असून व्हीपीएनचा वापर झाला होता का, याचीही पडताळणी केली जात आहे.
या घटनांनंतर संबंधित जिल्हा न्यायालयांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. न्यायालयांच्या आवारातील वाहनांची आणि संशयास्पद वस्तूंची तपासणी केली जात आहे. पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. परिसरात संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.