धाराशिव जिल्ह्याचा नवा विक्रम! यंदाच्या हंगामात ६२ लाख ११ हजार ७७० मेट्रिक टन उसाचं गाळप
यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १४ सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर गाळप केले.
दुष्काळाची ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याने यंदाच्या हंगामात ६२ लाख ११ हजार ७७० मेट्रिक टन उसाचे गाळप करून (Marathwada) मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केवळ ६०४ मिलीमीटर सरासरी वार्षिक पर्जन्यमान असतानाही हे यश मिळवणे विशेष उल्लेखनीय मानले जात आहे. जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत पर्जन्यमानात काही प्रमाणात सुधारणा झाली तसेच सिंचन साधनांचा विस्तार झाल्यामुळे ऊस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढले.
परिणामी, साखर कारखान्यांची संख्या आणि गाळप क्षमता दोन्हींमध्ये वाढ झाली. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १४ सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर गाळप केले. धाराशिवनंतर लातूर जिल्ह्याने ५५ लाख ३१ हजार २५० मेट्रिक टन गाळपासह दुसरे स्थान मिळवले आहे. बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांनीही लक्षणीय गाळप नोंदवले आहे.
विदर्भाला अवकाळीचा तडाखा; हातातोंडाशी आलेलं पिक गेलं, शेतकरी मेटाकुटीला
संपूर्ण मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदा एकूण २ कोटी ९९ लाख ६० हजार १५९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले, ज्यातून २ कोटी ६१ लाख ३३ हजार ३६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. उत्पादकतेच्या बाबतीतही जिल्ह्याने लक्षणीय प्रगती केली आहे. २०१८-१९ मध्ये प्रतिहेक्टरी ५१ मेट्रिक टन असलेली उत्पादकता २०२४-२५ मध्ये ६७ मेट्रिक टनांवर पोहोचली आहे. तुळजापूर तालुक्यात काही शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिहेक्टरी उत्पादकता १२० मेट्रिक टनांपर्यंत नेल्याचे सांगण्यात येते.
ठिबक सिंचन, सुधारित बियाणे, माती परीक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या एकत्रित वापरामुळे कमी पावसाच्या प्रदेशातही ऊस शेती फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पाणी व्यवस्थापन अवलंबल्याने उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. सात वर्षांत उसाचे क्षेत्र अडीच पटींनी वाढलेल्या धाराशिव जिल्ह्याचा हा प्रवास राज्यातील इतर दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरण्याची शक्यता आहे.