सुनील केंद्रेकरांची स्वेच्छानिवृत्ती; बीड लोकसभेचा उमेदवार ठरला? पण ‘ते’ तर म्हणतात…
छत्रपती संभाजीनगर : धडाकेबाज सनदी अधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil kendrekar) यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज अखेर स्वीकारण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या पत्रानुसार केंद्रेकर यांचा येत्या 3 जुलै रोजी कामाचा अंतिम दिवस असणार आहे. केंद्रेकर यांनी 24 आणि 25 मे रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. तो आज (27 जुन) शासनाने मंजूर केला आहे. (IAS officer Sunil kendrekar will contest loksabha election from beed constituency after retirement)
दरम्यान, केंद्रेकर यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर ते निवडणुकीला उभे राहणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ते बीड लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. ते निवडणुकीला कोणत्याही पक्षातून उभे राहिले तरी निवडून येऊ शकतात, असा दावा बीडमधील नागरिक करतात. केंद्रेकर यांचे हितचिंतक, जवळचे मित्र आणि बॅचमेट अधिकारी यांनी ते बीड लोकसभेसाठी तयारी करत असल्याच्या चर्चांना दुजोरा दिला आहे.
मोठी बातमी! कर्तव्यदक्ष IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय, पण कोर्ट म्हणाले…
मात्र केंद्रेकरांनी या चर्चांचं खंडन केलं. लेट्सअप मराठीशी बोलताना ते म्हणाले, स्वेच्छानिवृत्ती घेण्याची आपली काही खाजगी कारणं आहेत. निवडणुकीला उभं राहणार किंवा राजकीय पक्षात प्रवेश करणार, या चर्चांबाबत विचारलं असता, त्यांनी या चर्चांचे खंडन केले. आपला तसा कोणताही विचार नाही. माझी काही खाजगी कारणं आहेत, पण निवडणूक आणि राजकारण याबाबत कोणताही विचार नाही, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले.
केंद्रेकर अन् बीडचं जवळचं नातं :
केंद्रकर आणि बीड जिल्ह्याचं जवळचं नातं आहे. यापूर्वी त्यांनी बीडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून काम करताना त्यांच्या अधिकारकक्षेत बीड जिल्हा येत होता. या दरम्यान काम करताना त्यांनी बीडमधील चारा घोटाळा, बीड जिल्हा बँकेतील घोटाळा उघकीस आणला होता. त्यांची बीडमधून बदली झाली तेव्हा नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे त्यांची बीडमध्ये चांगली लोकप्रियता आहे.
Sunil Kendrekar : कोर्टाने कौतुक केले; सेवेत ठेवण्याचे आदेश दिले… त्यानंतरही शिंदे सरकारचा केंद्रेकरांना नारळ!
उच्च न्यायालयानेही म्हटले होते सेवेत रहा..
दरम्यान, केंद्रेकर यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्वीकारु नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला दिले होते. केंद्रेकर उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत. अध्यक्ष म्हणून ते त्यांचे काम अतिशय उत्तम करत असून त्यांच्या अनुभवाची आणि शिस्तीची या प्रकल्पासाठी गरज आहे, त्यामुळे मार्च 2024 पर्यंत ही योजना अंतिम टप्प्यात येईपर्यंत केंद्रेकर यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर करु नये असे न्यायालयाने म्हटले होते.
मात्र स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज असल्याने राज्य शासनाने केंद्रेकर यांना अडवून न ठेवता त्यांचा अर्ज मंजूर केला. यावर आज न्यायालयाने कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच केंद्रेकर यांच्या कामाचे कौतुक करत ते निवृत्त झाल्यानंतर देखील या प्रकल्पावर सामान्य नागरिकाप्रमाणे लक्ष ठेवू शकतात, सुचना देऊ शकतात, असे मत व्यक्त केले.