Jalna Maratha Andolan : जालन्याचे एसपी तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, सरकारकडून पोलिसांवर कारवाई सुरू

  • Written By: Published:
Jalna Maratha Andolan : जालन्याचे एसपी तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, सरकारकडून पोलिसांवर कारवाई सुरू

Jalna Maratha Andolan : गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. मात्र, आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानं राज्याच्या विविध भागात संतापाची लाट उसळली. आंदोलकांनी  रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध केला. लाठीचार्ज करणाऱ्या दोषी पोलिसांवर (Jalna Police) कारवाई करण्याचे आश्वासन देत राज्य सरकारने मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केलं. दरम्यान, जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी (Tushar Doshi) सक्तीच्या रजेवर गेले आहेत.

जालन्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी सायंकाळी हिंसक वळण लागल्याने पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांचे नाव चर्चेत आहे. आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. गृह विभागाने ही कारवाई केली आहे. अंतरवली सराटी येथे घडलेल्या हिंसाचारात अनेक आंदोलक जमखी झाले. या आंदोलनाने उग्र रुप धारण केल्यानं विरोधकांनी सरकारवर टीका केली. यानंतर गृहमंत्रालयाने या संपूर्ण घटनेची दखल घेतली घेत एसपींना सक्तीच्या रजेवर पाठवले.

जरांगे यांचे सरकारला आवाहन
दरम्यान, मनोज जरांगे यांनी सांगितले की, आम्ही कोणतीही दगडफेक केलेली नाही. आम्हाला मारहाण करणारे सगळेच पोलीस बडतर्फ पाहिजे आणि आमच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. एक ओळीचा आरक्षणाचा जीआर काढा,आणि विषयाला पुर्णविराम द्या, असं जरांगे यांनी सरकारला आवाहन केलं.

1 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. राज्यभरातील एसटी बस, आणि इतर घटकांवरतीही याचा मोठा परिणाम झाला. राज्याच्या अनेक भागात जिल्हा बंद आणि शहर बंदची हाक देण्यात आली आहे. उद्या (सोमवारी) अनेक जिल्ह्यांमध्ये बंदही पुकारण्यात आला आहे.

मराठी क्रांती संघटना, मराठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. काही मराठी कार्यकर्त्यांनी आपल्या गाड्या पेटवल्या आहेत. या संघटना आणि आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते म्हणाले की, मराठी समाजाच्या वेदनांची मला जाणीव आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यत मी स्वस्थ बसणार नाही. मात्र, मराठी समाजाने संयम दाखवावा, कायदा हातात घेऊ नये.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube