सर्वात मोठी बातमी : कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त, रोहित पवारांना धक्का
Kannad Sugar Factory Land Attached By ED : संभाजीनगर: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासंबंधित कारखान्यावर आता ईडीने कारवाई केली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने (Baramati Agro) खरेदी केलेला संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील साखर कारखाना (Kannad sugar factory) ईडीने (ED) जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांची ईडीने मुंबईत चौकशी केली होती. त्यानंतर बारामती अॅग्रोशी निगडीत कारखाना जप्त झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वीच रोहित पवारांना मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे.
आदित्य-तेजस त्यांना काका म्हणायचे, घरातलाच माणूस फिरला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
ED, Mumbai has attached 161.30 acres of land, plant & machinery and building structures of a sugar unit at Kannad, Aurangabad presently in possession of M/s Baramati Agro Ltd. worth Rs. 50.20 Crore under PMLA in a case related to illegal sale of Sugar factories by Maharashtra…
— ED (@dir_ed) March 8, 2024
लोकसभा निवडणुकांमध्ये नामोहरम करण्यासाठीच कारवाई
रोहित पवार यांच्या साखर कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान युवा आमदार ज्यांनी युवा संघर्ष यात्राकाढून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे. विधिमंडळामध्येसुद्धा शेतकरी असतील महिला असतील युवक असतील बेरोजगार असतील सगळ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या रोहित पवारांवर केंद्र सरकारने ईडीमार्फत कारवाई केली आहे. विरोधकांना खच्ची करण्यासाठी ही सगळी मोहीम सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून राबवली जात आहे. रोहित पवार भाजपला अडचणीचे वाटत असल्याचेही लवांडे म्हणाले. रोहित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार न घाबरता राज्यभर फिरत असल्याने भाजपनं सुडबुद्धीने रोहित पवारांची ईडी चौकशी केल्याचा आरोपही लवांडे यांनी केला आहे. तसेच भाजपने अशा पद्धतीने यंत्रणाचा दुरुपयोग करून कारवाई केली तरी महाराष्ट्रातील जनता दिल्ली पुढं झुकणार नसल्याचे लवांडे यांनी म्हटले आहे.
रोहित पवार केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडावर
गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. काहीच दिवसांपूर्वी रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती. ईडीने पुणे, बारामती आदी ठिकाणी छापे टाकले होते. ईडीच्या पथकाने एकूण 6 ठिकाणी छापे टाकले. यासोबतच आयकर विभागाने रोहित पवारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड साखर कारखान्यावरही छापा टाकला होता. मात्र तेव्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. मात्र, आज ईडीने रोहित पवारांचा हाच कारखान्यावर कारवाई करत तो जप्त केला आहे.
रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला होता. बारामती अॅग्रो कंपनीविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेले आदेश उच्च न्यायालयाने रद्द केले होते. बारामती अॅग्रो कंपनीचे दोन प्लांट रद्द करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते. त्याविरोधात रोहित पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हापासून रोहित पवारची बारामती अॅग्रो कंपनी चर्चेत होती.
रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. अजित पवारांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. मात्र, रोहित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आहेत. त्यामुळं त्यांना ईडीने नोटीस पाठवल्याचं बोलल्या जातं.