मोठी बातमी! मराठवाड्यातील 55 हजार लाडक्या बहिणी अपात्र; हप्ता होणार बंद, काय घडलं?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेत राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. या योजनेबाबत गोंधळाचं वातावरणही कायम आहे. ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेतून वगळलं जाणार आहे. तसेच अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांची नावेही वगळली जाणार आहेत. यासाठी राज्य सरकारकडून आयकर विभागाची मदत घेतली जात आहे. दरम्यान, या घडामोडी घडत असतानाच मराठवाड्यातून धक्कादायक बातमी आली आहे.
लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना मिळाले 450 कोटी; धक्कादायक माहिती उघड..
मराठवाड्यातील 21 लाख 97 हजार 211 पैकी तब्बल 55 हजार 334 महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत. मराठवाड्यातून अर्ज केलेल्या 54 हजार 598 अर्ज अद्याप मंजूरच झालेले नाहीत. तसेच अर्ज रद्द झालेल्या महिलांना आता फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही हे देखील स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यात लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. या पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या महिलांचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील महिलांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र या काळात सरकारी यंत्रणांनी निकषांकडे फारसे लक्ष न देता अर्ज मंजूर केले होते. त्यामुळे लाभार्थी संख्येचा आकडा प्रचंड वाढला होता. इतक्या लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये देताना सरकारी तिजोरीही रिकामी होऊ लागली. या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली.
चारचाकी वाहने असणाऱ्या महिला तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या महिलांची नावे योजनेतून वगळली जात आहेत. तसेच या योजनेसाठी अन्य जे काही निकष आहेत त्या निकषांनुसारही लाभार्थी कमी केले जात आहेत. विविध निकषांनुसार मराठवाड्यात आतापर्यंत 55 हजार 334 महिला अपात्र ठरल्या आहेत. मराठवाडा विभागात एकूण 23 लाख 7 हजार 184 महिलांनी अर्ज केले होते. त्यातील 21 लाख 97 हजार 211 अर्ज वैध ठरले तर 54 हजार 598 अर्जांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
मोठी बातमी! ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले, वाचा नेमकी कारणे काय?
मराठवाड्यातील जिल्ह्यांचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर 6 हजार 655, धाराशिव 2 हजार 533, लातूर 8 हजार 1, जालना 9 हजार 622, हिंगोली 5 हजार 825, परभणी 2 हजार 802, बीड 9 हजार 364 आणि नांदेड जिल्ह्यातील 10 हजार 532 अशा एकूण 55 हजार 334 लाडक्या बहिणींचे अनुदान आता बंद होणार आहे.
ही दोन कागदपत्रे असतील तरच पैसे
योजनेतील नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यात बँकेत ई केवायसी सादर करावे लागणार आहे. तसेच सर्व महिलांना हयातीचा दाखला देखील द्यावा लागणार आहे. यानंतरच पैसे खात्यात जमा होणार आहेत अशी माहिती देण्यात आली.