मराठवाड्यातील सहा आमदारांना लाल दिवा; तीन नव्या चेहऱ्यांचीही मंत्रिमंडळात एन्ट्री
Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा आज (Maharashtra Cabinet Expansion) सायंकाळी पार पडला. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी एकूण ३९ आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यामध्ये ३३ आमदारांना कॅबिनेट तर सहा आमदारांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राज्यातील प्रादेशिक विभागांचा विचार केला तर मराठवाड्यातील सहा आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे तर तीन नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याच्या वाट्याला सहा मंत्रिपदे आली आहेत. मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे येतात. यातील बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ बहिणीच्या रुपात दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात भाजप आमदार अतुल सावे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. अतुल सावे याआधीच्या सरकारमध्येही मंत्री होते. आता या नव्या सरकारमध्येही त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे.
मंत्रिमंडळात किती लाडक्या बहिणी? जाणून घ्या, किती महिला आमदार होणार मंत्री..
यंदा मराठवाड्यातून काही नवीन चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आमदार संजय शिरसाट, मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाट सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. भाजप नेत्या मेघना बोर्डीकर या सुद्धा परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मतदारसंघातून बाबासाहेब पाटील विजयी झाले आहेत. या तिन्ही आमदारांना आता पहिल्यांदाच मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.