Manoj Jarange : मराठा आरक्षण मार्गी लागल्यानंतर राजकारणात येणार का? जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मागील तीन महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला आहे. जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांनाही घाम फोडला आहे. आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यात दौरे केले. लाखोंच्या सभा घेतल्या. राजकारणी लोकांच्या सभेला जमणार नाही इतकी गर्दी त्यांच्या सभांना होत आहे. त्यांना मिळत असलेला हा जनाधार पाहता आता भविष्यात जरांगे पाटील राजकारणात येतील का, असा प्रश्न विचारला जात आहे. काही जणांनी तर त्यांना राजकारणात येण्याची ऑफरही दिली आहे. यावर स्वतः जरांगे पाटील यांनीच प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
राजकारणाने आमचा घात केला. आम्ही राजकारणात येणार नाही. आंदोलनाच्या माध्यमातूनच आम्ही न्याय मिळवू. राजकारणाबद्दल आम्हाला चीड आहे. जनचळवळींच्या माध्यमातूनच गोरगरिबांना न्याय देऊ. राजकारण वाईट गोष्ट आहे तिकडे गेल्यावर कोण बिघडेल काहीच सांगता येत नाही.
Manoj Jarange : अजून किती दिवस आम्हाला वेड्यात काढणार? मनोज जरांगेंचा अजितदादांना सवाल
आंदोलनासाठी मी 20 तारीख दिली समाजाने काही न बोलता मान्यही केली. समाजाकडून आता या आंदोलनाची तयारी केली जात आहे. मराठा समाजाबद्दल मला एक टक्काही शंका नाही. पण राजकारण नकोच. समाज माझ्या पाठिशी आहे. सामान्य मराठा समाजाने आता घराणेशाही मोडित काढली आहे. राजकारणापेक्षा मला स्वतःवर जास्त विश्वास आहे. समाज मला जर राजकारणात आणणार असेल तर मी हिमालयात जाईन, असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर मी हिमालयात जाणार पण राजकारणात येणार नाही, असे जरांगे पाटलांना ठासून सांगितले.
20 जानेवारीला मुंबईत धडकणार
मुंबईतले आंदोलन सगळ्यात मोठे असणार आहे. सर्व कामं आटोपून ठेऊन मुंबईत धडकायचं आहे. मिळेल त्या वाहनाने मुंबईत या. सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे, आम्हाला पायी मुंबईला यायची हौस नाही. ज्या गावातून मराठा येणार त्यांचे नियोजन त्याच गावातील मराठा बांधव करणार आहेत, त्यामुळे जेवणाचा ताण पडणार नाही. तयारी आता पूर्ण होत आली आहे आता आम्ही सज्ज आहोत. मोठ्या ताकदीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असे माझ्यासकट समाजाने ठरविले आहे. मुंबईमधील प्रत्येक जाती-धर्मातील लोकांनी आमचे स्वागत केलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.