Suresh Dhas : ‘जाळपोळ घटनेत राजकीय पक्षांना टार्गेट, हल्लेखोर हे आंदोलक नाहीत, मास्टरमाईंड शोधा…’

  • Written By: Published:
Suresh Dhas : ‘जाळपोळ घटनेत राजकीय पक्षांना टार्गेट, हल्लेखोर हे आंदोलक नाहीत, मास्टरमाईंड शोधा…’

MLA Suresh Dhas : मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) उपोषण करत असतांना 30 तारखेला आंदोलनाला हिंसक वळण लागलं. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरांवर दगडफेक करून त्यांची घरे जाळण्यात आली. अनेक राजकीय पक्षांची कार्यालये जाळण्यात आली. आता यावर भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी भाष्य केलं. जाळपोळ घटनेत राजकीय पक्षांना टार्गेट करण्याल असून हे आंदोलक नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं.

विराटचे शतक, सचिनची खास पोस्ट : विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर काय म्हणाला मास्टर ब्लास्टर? 

आज माध्यमांशी बोलतांना सुरेश धस म्हणाले की, बीडमध्ये तीस तारखेला ज्या जाळपोळीच्या घटना घडल्या, त्या अतिशय दुर्देवी आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात असं कधीही झालं नव्हतं. आरक्षणाची अनेक आंदोलन या देशानं पाहिली, मात्र, पक्षांचे कार्यालयं जाळणं, लोकप्रतिनिधींची घरं जाळणं असा अनर्थ कधीच झाला नाही. यात केवळ एखाद्या राजकीय पक्षाला, एखाद्या लोकप्रतिनिधीलाच टार्गेट करण्यात आलं नाही. ज्यांचा या जाळपोळीत हात होता, त्यांनी सर्वच राजकीय टार्गेट केलं. राजकीय लोकांची घरं जाळली, राजकीय पक्षांची कार्यालये जाळण्यात आली. राजकीय पक्षांच्या संबंधित लोकांची हॉटेल जाळण्यात आली. या जाळपोळीच्या घटनेत राजकीय लोकांना, राजकीय पक्षांना टार्गेट करण्यात आलं. आणि हे सर्व कुणीतरी ठरवून केलं, असं धस म्हणाले.

धस म्हणाले, आजवर मराठा मोर्चे निघाले, त्यात आमचे अनेक सहकारी सहभागी असायचे. जे मराठा आंदोलक बीडमध्ये आंदोलन करत होते, ते या जाळपोळीत दिसले नाहीत. जाळपोळ करणारे हे एकदम नवीनच होते. मुळ आंदोलनातलं यात कुणीही नव्हतं. हल्ला करणारे १०० टक्के आंदोलकच होते असं नाही. कारण, आमच्यापैकी अनेकांचा आंदोलनात सहभाग होता. अनेकांनी पाठिंबा दिला होती. सातत्याने आंदोलन करणाऱ्यांचा यात सहभाग असता तर ते दिसले असते. हल्ल्यांमध्ये जिल्ह्याबरोबर बाहेरचेही लोक असण्याची दाट शक्यता आहे, असं धस म्हणाले.

आमदार प्रकाश सोळंकेंनी राजकीय सुडातून घर जाळण्यात आलं, असं म्हटलं. याविषयी विचारलं असता धसं म्हणाले की, सोळंके जे बोलले, त्यावर मी अधिक बोलणं योग्य नाही. त्यांची क्लीप व्हायरल झाली, त्या क्लीपमध्ये ते सोळंके जे बोलले, ते ऐकूण जाळपोळ करणाऱ्यांना रोष अनावर झाला असेल, त्यामुळं त्याचं घर जाळलं असावं. पण, बीडमध्ये तर कोणता राजकीय नेता काही बोलला नाही. सर्वांनीच आंदोलनाला समर्थन दिलं. मग तरीही पक्षांची कार्यालये फोडण्यात आली, शासकीय कार्यालये जाळण्यात आली. नक्कीच याच्यामागे कुणीतरी मास्टमाईंड आहे.

धस यांनी सांगितलं की, हल्ले करायचे होते, ती कार्यालय, घरं यांना कोड नंबर दिले होते. हे फार मोठं षडयंत्र आहे. याची तयारी आधीच करण्यात आली होती. यातील अनेक हल्लेखोरांकडे बॅग, दगड, पेट्रोल होतं. हे सगळं कुणीतरी काहीतरी प्लॅन करून केलं. त्यामुळं याचा मास्टरमाईंड शोधून काढावा, अशी मागणी धस यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube