माजी मुख्यमंत्र्यांचा मेहुणा अन् अजितदादांची भेट, राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, नांदेडात काय घडतंय?

Maharashtra Politics : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीत पडझड सुरुच आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांना गळती लागली आहे. नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी एक एक करून पक्ष सोडून जात आहेत. सत्ताधारी महायुतीतही चलबिचल सुरू आहे. एकमेकांच्या पक्षात जाण्यासाठी नेते फिल्डिंग लावत आहेत. नांदेडमध्ये सध्या अशाच घडामोडी घडत आहेत. दोन वेळा काँग्रेस आणि दोन वेळा भाजप असा राजकीय प्रवास असलेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, माजी खासदार खतगावकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे (Ashok Chavan) सख्खे मेहुणे आहेत.
नांदेडमध्ये पाच महिन्यांत मोठी उलथापालथ! लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय
माजी खासदार खतगावकर तीन वेळेस आमदार आणि तीन वेळेस खासदार राहिले आहेत. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपाचा झेंडा हाती घेतला होता. नंतर काही काळानंतर ते पुन्हा काँग्रसमध्ये आले होते. 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीत आले होते. त्यांच्याबरोबर खतगावकर भाजपात आले होते.
परंतु, त्यांचे पक्षांतर सुरुच राहिले. विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी पुन्हा पक्ष बदलला. काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी स्नुषा डॉ. मीनल खतगावकर यांना नायगाव मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट मिळवून दिले होते. परंतु, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या नंतर भास्करराव पाटील खतगावकर शिंदे गट किंवा अजित पवार गटात सहभागी होतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
दरम्यान, शुक्रवारी अजित पवार नांदेड आणि परभणी दौऱ्यावर आले होते. परभणीवरून पुण्याला निघणार होता. परंतु, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपला ताफा खतगावकर यांच्या घराकजडे वळवला. दोन्ही नेत्यांची भेट झाली. त्यानंतर काही वेळ बंद दाराआड चर्चा देखील झाली. यावेळी माजी मंत्री नवाब मलिक देखील उपस्थित होते. या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती देण्याचे मात्र अजित पवार यांनी टाळले. त्यामुळे खतगावकर आता काय निर्णय घेणार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार या प्रश्नांचे उत्तर लवकरच मिळेल.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन PM मोदींनी 13 कोटी मराठी जनतेला आनंद दिला; अजित पवार
अजित पवार यांची भेट झाली. त्यांच्याशी चर्चा झाली. मात्र ही चर्चा राजकीय नव्हती असे खतगावकर यांनी माध्यमांना सांगितले. मात्र तुम्ही वारंवार राजकीय भूमिका बदलत आहात असे पत्रकारांनी विचारल्यानंतर मात्र खतगावकर चांगलेच भडकल्याचे दिसून आले.