“शासकीय रुग्णालये म्हणजे गोरगरिबांचे कत्तलखाने” : जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकरावर हल्लाबोल

“शासकीय रुग्णालये म्हणजे गोरगरिबांचे कत्तलखाने” : जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकरावर हल्लाबोल

नांदेड : “या राज्यातील शासकीय रुग्णालये ही गोरगरिबांचे कत्तलखाने बनली आहेत. इतकं अकार्यक्षम आणि असंवेदनशील सरकार या राज्याने कधीच अनुभवलेले नाही.” असं म्हणत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमधील शासकीय रुग्णालयातील मृत्यूच्या सत्रानंतर शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. (NCP (Sharad Pawar) group leader Jitendra Awad criticizes Shinde government after death session in government hospitals in Nanded, Chhatrapati Sambhajinagar and Nagpur)

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

या राज्यातील शासकीय रुग्णालये ही गोरगरिबांचे कत्तलखाने बनली आहेत. ठाण्यातील शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात 27 मृत्यू, नांदेड मध्ये एकाच दिवसात 24 मृत्यू, काल घाटी (संभाजी नगर) येथे जवळपास 20 जणांचा मृत्यू, तर आज नागपूर मध्ये 24 तासात 25 जणांचा मृत्यू. इतक्या भयंकर घटना घडत आहेत. यावर हे ट्रीपल इंजिनच राज्य सरकार आणि संबंधित खात्याचे मंत्री अवाक्षर काढायला तयार नाहीत.

Nanded Hospital Deaths : ‘दवाखान्याची परिस्थिती वाईटच’; मुश्रीफांनीच मान्य केलं ‘सरकारी आरोग्या’चं वास्तव

या रुग्णालयात पुरेश्या सुविधा नाहीत,स्टाफ ची कमकरता आणि औषधांचा पडलेला दुष्काळ गोर गरीब रुग्णांच्या जीवावर बेततो आहे. राज्यातील फक्त शासकीय रुग्णालयेच नाही तर हे ट्रीपल इंजिन सरकार देखील वेंटीलेटर वर असल्याचं दिसून येत आहे.इतकं अकार्यक्षम आणि असंवेदनशील राज्य सरकार या राज्याने कधीच अनुभवलेले नाही, असं म्हणत आव्हाड यांनी ट्विटर पोस्टमधून निशाणा साधला.

नागपूरमध्ये 25 मृत्यू :

नांदेड, छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ आज नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्येही मृत्यूचे सत्र पाहायला मिळाले आहे. नागपूर मेडिकल कॉलेज आणि मेयो या रुग्णालयात 24 तासांत 25 रुग्ण दगावले आहेत. यात मेडिकलमधील 16 आणि मेयोमधील 9 रुग्ण दगावले आहेत. विविध वयोगटातील हे रुग्ण असून त्यातील काहीजण परराज्यातील आहेत.

डीनला शौचालय साफ करायला लावणं भोवलं : खासदार हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नांदेड आणि औरंगाबादमध्येही मृत्यूचे सत्र :

नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर मंगळवारी पुन्हा 11 रुग्ण दगावले. त्यामुळे दोन दिवसांत मृत रुग्णांचा आकडा तब्बल 35 पर्यंत गेला. तर छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही 24 तासांत मृत 18 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तर निघाली होती. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयातील 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा नागपूरमध्ये 24 तासांत 25 रुग्ण दगावले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube