सासरच्या लोकांचा रोज त्रास अन् छळ; 20 वर्षीय पूजाने उचललं टोकाचं पाऊल
या घटनेने पूजाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.
बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात संतापजनक घटना घडली आहे. (Beed) येथेली 20 वर्षीय विवाहितेने स्वतःचं जीवन संपवलं आहे. या धक्कादायक घटनेमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पूजा प्रमोद सुरवसे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणाने सासरच्या लोकांच्या छळाचा अध्याय सर्वांसमोर उघड झाला आहे. मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पूजाचे तिच्या माहेरच्यांशी बोलणं झालं होतं, मात्र त्यानंतर काही तासांतच तिने आत्महत्या केली. वडिलांना फोनवरून मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली, जिथे त्यांना मुलीचा मृतदेह पाहून धक्का बसला. पूजाचा मृतदेह गेवराई येथील शासकीय रुग्णालयात आढळून आला. या घटनेने पूजाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.
नीट पेपरफुटीतील आरोपी कुलकर्णीच्या घरावर बुलडोझर; बीड पालीकेची कारवाई
मृत विवाहितेच्या भावाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर पूजाचा पती प्रमोद साईनाथ सुरवसे, सासरे साईनाथ बापुराव सुरवसे, सासू उषाबाई उर्फ जिजी साईनाथ सुरवसे, दीर गणेश साईनाथ सुरवसे, जाऊ आरती गणेश सुरवसे आणि नणंद अर्चना तुळसे यांनी तिला सतत त्रास दिला. लग्नानंतर हे सर्वजण पूजाकडं व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत होते. या मागणीसाठी तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावं लागत होतं. या जाचाला कंटाळून आणि सासरच्या छळाला वैतागून पूजाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.
या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलीस यंत्रणेकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. तक्रारीतील सर्व मुद्द्यांची पडताळणी केली जात असून, पोलिसांकडून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. विवाहितेच्या आत्महत्येमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, हुंडाबळीच्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा विवाहित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.