खोक्या भोसलेवर शिकारीचा आरोप, वनविभागाचा पंचनामा; तपासात आढळल्या धक्कादायक गोष्टी

खोक्या भोसलेवर शिकारीचा आरोप, वनविभागाचा पंचनामा; तपासात आढळल्या धक्कादायक गोष्टी

Beed News : भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे एक एक कारनामे समोर येत आहेत. खोक्या भाईला शिकारीचा शौक होता. त्याने परिसरातील हरणांची शिकार त्यांचे मांस खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पाटोदा येथील वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पथकाला येथे मृत प्राण्याचे सांगाडे सापडले. हे सांगाडे हरिण आणि काळविटाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर आता सतीश भोसलेच्या मुसक्या आवळण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला हरीण आणि मोरांच्या शिकारीचा शौक होता. खोक्याने आतापर्यंत साधारण 200 पेक्षा जास्त हरिणांना मारल्याचं आजूबाजूच्या गावचे लोक सांगतात. याशिवाय डोंगरात वागूर (पक्षी पकडण्याचे जाळे) लावून कित्येक मोरही खाल्ल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकाराची माहिती खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी हरणांना मारुन खाण्यात आले त्याठिकाणी जाऊन वनविभागाने पंचनामा केला आहे.

गरिबाला अमानुष मारहाण, नोटांची उधळपट्टी अन् धसांबरोबर फोटो; बीडचा सतीश भोसले नेमका कोण?

वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ठीकाणी तपासणी केली असता त्यांना हरणाचे शिंग आढळून आले. शिंग जप्त करून फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी सतीश भोसलेवर 200 हरीण, काळविटांच्या शिकारीचा आरोप आहे. आरोप झाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी शिरुर तालुक्यात पाच ठिकाणी पंचनामे केले. या ठिकाणी हरणांची शिकार झाल्याचा संशय आहे.

यातील एका ठिकाणी मृत हरणाचे अवशेष आढळून आले आहेत. या अवशेषांची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. मागील चार ते पाच वर्षांत शिरुर कासार तालुक्यात हरीण, ससे, काळवीट आणि अन्य वन्यप्राण्यांची संख्या जास्त होती. परंतु, आता या प्राण्यांची संख्या कमालीची घटली आहे. यातच 200 हरिण काळविटांची शिकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मारहाणीचा व्हिडिओ सतीश भोसलेला ओळखतो, पण मीच बॉस..सुरेश धस धक्कादायक बोलले

मारहाणीनंतर खोक्या भाई फरार

आठ दिवसांपूर्वी सतीश भोसले आणि त्याचे सहकारी दिलीप ढाकणे यांच्या शेतात हरणं पकडत होते. त्यावेळी दिलीप ढाकणे यांनी त्यांना हरणं पकडण्यास मज्जाव केला. तेव्हा खोक्या भाई आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केली. यामध्ये दिलीप ढाकणे यांचे 8 दात पडले आहेत आणि त्यांचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. ढाकणे यांच्या मुलाचाही पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला लंगडत चालावे लागत आहे. त्याच्या अंगावर वारही आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube