Video : पैशांचे गठ्ठे घेऊन जाणारा सतीश भोसले कोण?; दमानियांनी विचारणा करताच धसांचं स्पष्टीकरण

Video : पैशांचे गठ्ठे घेऊन जाणारा सतीश भोसले कोण?; दमानियांनी विचारणा करताच धसांचं स्पष्टीकरण

Suresh Dhas Press Conference : भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याचा मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधकांनी आमदार सुरेश धस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. यानंतर हाच सतीश भोसले पैसे उधळतानाचा आणखी एक व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुढे आणला आहे. यानंतर आता आमदार सुरेश धस यांनी भाष्य केलं आहे. सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे. मी कधीही ही गोष्टी नाकारलेली नाही. तो मला कधीतरी भेटलाही होता. परंतु, माझ्यामागे तो काय करतो हे मला माहिती नाही, असे सुरेश धस म्हणाले आहेत.

सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय मुळात ही घटना दीड वर्षांपूर्वीची आहे. सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे ही गोष्ट मी नाकारत नाही. महिलेच्या छेडछाडीवरून तो काहीतरी प्रकार घडलेला आहे. यात जो कुणी पीडित असेल त्याने समोर येऊन फिर्याद द्यावी. ही घटना बीड जिल्ह्यातील नाही बुलढाणा जिल्ह्यातील की कुठेतरी घडलेली आहे. आता यातील पीडिताने जर फिर्याद दिली तर त्यावर गुन्हा दाखल करावा असे मी स्पष्टपणे सांगितले आहे.

असे काही कृत्य करायला कुणाचा आशीर्वाद असतो का? अशा काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का? काहीतरी विनाकारण बोलू नये. मी कालच स्पष्टपणे सांगितले आहे की समोरचा जो कुणी पीडित असेल त्याने फिर्याद द्यावी अशा शब्दांत सुरेश धस यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. सतीश भोसलेला मी ओळखतो. तो कधीकधी माझ्याकडे येतो. पण पाठीमागे तो असे काही उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे असेही धस म्हणाले.

मी परत एकदा सांगतो ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्याने जर पुढे येऊन फिर्याद दिली तर यावर कायदेशीर कारवाई झाली पाहीजे. त्याच्याकडून तुमच्या फोटोचा वापर केला जातोय आणि तो तुम्हाला बॉस देखील म्हणतोय असे विचारले असता धस म्हणाले, कोण कुणाला बॉस म्हणतो या प्रत्येकाची माहिती ठेवता येत नाही. पण तो जर मला बॉस म्हणत असेल मी जरी त्याचा बॉस असेल तरी आता बॉसच म्हणतोय की त्याच्यावर कारवाई झालीच पाहीजे.

अंजली दमानियांकडून आणखी एक व्हिडिओ ट्विट

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आणखी एक व्हिडिओ पुढे आणला आहे. या व्हिडिओत सतीश भोसले नोटांची बंडलं दाखवत आहे. काही वेळानंतर नोटांची बंडले कारच्या डॅशबोर्डवर फेकून मारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की हाच तो सतीश भोसले? कोण आहे हा? अटक करा ह्या माणसाला अशी मागणी त्यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube