परळीत दिवसाढवळ्या तरुणाचं अपहरण; नागरिणांमध्ये भीती, काय घढलं?

पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत परभणी जिल्ह्यातील सायखेडा आणि निपाणी येथील ६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

News Photo   2026 06 20T170136.214

बीडच्या परळी शहरात भरदिवसा (Beed) एका तरुणाचे चारचाकी गाडीतून अपहरण करण्यात आल्याची थरारक घटना समोर आली आहे. ऊसतोडणीच्या कामासाठी घेतलेल्या उचल पैशांच्या वादातून हा गंभीर प्रकार घडला आहे. परळी शहर पोलिसांनी २४ तासांच्या आत धडक कारवाई करत ६ पैकी ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परळी परिसरात गुन्हेगारांच्या वाढत्या धाडसाबाबत खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, परळी येथील स्वाभिमाननगरचे रहिवासी विनोद नवनाथ वैरागे यांनी ऊसतोडणीच्या कामासाठी उचल पैसे घेतले होते. याच पैशांच्या आर्थिक व्यवहारावरून परभणी जिल्ह्यातील काही जणांशी त्यांचा वाद सुरू होता. शुक्रवारी (१९ जून) सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास विनोद वैरागे हे परळीतील अरुणोदय मार्केट परिसरात आले होते.

तिथे दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांना गाठले आणि जुन्या वादावरून वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, सर्व आरोपींनी संगनमत करून विनोद वैरागे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘जीवे मारू’ अशी धमकी देत आरोपींनी त्यांना बळजबरीने चारचाकी वाहनात डांबले आणि घटनास्थळावरून पोबारा केला.

बीड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट; 14 लघु प्रकल्प कोरडे, 71 प्रकल्प मृतसाठ्यात

या भरदिवसा झालेल्या अपहरणाच्या घटनेनंतर राजू प्रल्हाद कांबळे (वय ३० वर्षे, रा. सोरंझा, जि. परभणी) यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत परभणी जिल्ह्यातील सायखेडा आणि निपाणी येथील ६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील आप्पाराव उर्फ माऊली उजगरे, सचिन उजगरे, विश्वजित कदम, गिरीधर पुरी, दीपक चव्हाण आणि सचिन कदम यांच्यावर गुन्हे दाखल झाले करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी यातील तीन प्रमुख आरोपींना तातडीने ताब्यात घेतले आहे.

परळी शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) (अपहरण), ११५(२), ३५१ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परळी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि. नाचण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंगणे हे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. फरार असलेल्या इतर ३ आरोपींचा परळी शहर पोलीस कसून शोध घेत आहेत.

follow us