“भारतातही सत्ताबदलाचे प्रयत्न सुरू, पण त्याने काही होणार नाही”; विजयादशमी सोहळ्यात मोहन भागवतांचे मोठे विधान
Mohan Bhagwat Vijayadashami Speech; नागपुरातील रेशीमबाग मैदानावर झालेल्या संघाच्या विजयादशमी सोहळ्यात मोहन भागवत संबोधित करत होते.
Mohan Bhagwat Vijayadashami Speech: देशात विविधता असली, तरी एकतेच्या भावनेतून आपण एकजुटीने पुढे जायला हवे. देश आणि समाज केवळ नेत्यांमुळे चालत नाही, तर समाजच देशाला पुढे नेतो. त्यामुळे देशाच्या उभारणीत प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर झालेल्या संघाच्या विजयादशमी सोहळ्यात ते स्वयंसेवकांना संबोधित करत होते.
ठाकरे-शिंदेंच्या दसरा मेळाव्यात आज राजकीय संघर्ष; कोण कुणाला देणार प्रत्युत्तर?
‘आम्ही भारताचे लोक’ या भावनेतून एकजूट हवी
भारतीय राज्यघटनेत ‘आम्ही भारताचे लोक’ असा उल्लेख आहे. यातून एकतेची भावना व्यक्त होते. भारत विविधतेने नटलेला देश असला, तरी एक समाज आणि एक राष्ट्र या भावनेतून देश पुढे जात आहे. आपल्या पूर्वजांकडे याबाबतची अनुभूती होती, असे भागवत म्हणाले.
सत्ताबदलाने सर्व काही बदलत नाही
काही महत्त्वाकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देत आहेत. भारतातही सत्ताबदलाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सत्ताबदल झाला म्हणजे सर्व काही बदलतेच असे नाही, असे मत भागवत म्हणाले.
देश आणि समाज चालवण्याची जबाबदारी केवळ नेत्यांची नसून प्रत्येक नागरिकाचीही आहे. ‘हा देश आपला आहे, हा देश माझा आहे,’ या भावनेतून आंदोलने होत असतील, तर त्यात हरकत नाही. मात्र, आंदोलनामागे वेगळा हेतू असेल, तर त्याचा वापर राजकीय साधन म्हणून होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले.
समाजातील विरोधाचा देशाबाहेरील शक्तींना फायदा?
एखाद्या व्यक्ती, समूह किंवा समाजाविषयी विरोधाची भावना भडकवली जात असेल, तर त्याचा फायदा भारताबाहेरील शक्ती घेतात, असा दावा भागवत यांनी केला. एखाद्या समाजात अन्यायग्रस्त असल्याची भावना निर्माण करून त्या आधारावर स्वतंत्र सामाजिक ओळख उभी करणे आणि त्या समाजाला देशाच्या व्यवस्थेविरोधात वळवणे, असे प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणुकीत सगळच आपलं गृहीत धरू नका; गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटलांचा महाडिकांना टोला
अंमली पदार्थांची समस्या राष्ट्रीय चिंतेचा विषय
तरुणांमध्ये विवेकाचा अभाव असल्यामुळे अंमली पदार्थांची समस्या राष्ट्रीय स्तरावर गंभीर बनली आहे, असे भागवत म्हणाले. या व्यसनाविरोधात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही काम करेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.