तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हला मारून पाठवेन, शिंदेंचे खासदार संजय पाटलांची थेट पत्रकारांनाच धमकी
विरोधकांना हॉस्पिटलमध्ये किंवा स्मशानात पाठवेन अशी धमकी दिल्यांनतर आता संजय पाटलांनी पत्रकारांना देखील धमकी देत शिवीगाळ केली आहे.
MP Sanjay Patil directly threatens journalists : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडून आल्यानंतर शिंदे गटात सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधकांना हॉस्पिटलमध्ये किंवा स्मशानात पाठवेन अशी धमकी दिल्यांनतर आता त्यांनी पत्रकारांना देखील धमकी देत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भरती यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
संजय दिना पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकार त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी संतापलेल्या संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून, तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हला मारून पाठवेन, हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा. तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय. परत आलात तर मारून पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय. तुम्हाला करायचंय ते करा, असे शब्द वापरले.
यावेळी त्यांनी माध्यमांवरही नाराजी व्यक्त केली. तुम्ही माईक माझ्या तोंडासमोर कशाला धरता? आता तुम्ही तिकडे जाऊन आलात ना, मग इकडे येता. कशाला हे सगळं करताय? असे म्हणत त्यांनी पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरली. हा वाद काही दिवसांपूर्वीच्या त्यांच्या वक्तव्यामुळे सुरू झाला होता. ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रत्युत्तर देताना संजय दिना पाटील यांनी म्हटले होते, माझ्या वाट्याला जाणाऱ्यांना मी एकतर हॉस्पिटलमध्ये पाठवेन नाहीतर स्मशानात पाठवेन. आमच्या घराण्यात आम्ही एकेकाळी पाच लोकांचे खून पाडलेत.
भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला न्यायालयाचा दिलासा; एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
याच वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांनी 24 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिले. त्या पत्रात राऊत यांनी म्हटले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर संतापाची लाट आहे आणि विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. आंदोलन करणे आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, ईशान्य मुंबईचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.
राऊत यांनी पत्रात नमूद केले की, संजय दिना पाटील यांनी माझ्या नादाला लागू नका. माझ्याविरोधात आंदोलन करण्यापूर्वी जीवाचा विमा काढून घ्या. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, नाहीतर हॉस्पिटलमध्ये पाठवीन, असे वक्तव्य केले आहे. तसेच मी याआधी पाच लोकांना मारले आहे, “माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, “घरात घुसून मारेन, अशी विधाने केल्याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
याच आधारावर राऊत यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले असतील तर त्यांच्या घराची त्वरित झडती घ्यावी. त्यासाठी दहशतवादविरोधी पथकाची मदत घ्यावी. हे बॉम्ब त्यांना एखाद्या दहशतवादी संघटनेकडून मिळाले असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी कृत्यात सहभागी झाल्याप्रकरणी त्यांना तात्काळ UAPA अंतर्गत अटक करावी, अशी मागणी राऊत यांनी पत्रातून केली आहे.
दरम्यान, संजय दिना पाटील यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करत म्हटले, मी जे बोललोय ते खुलेआम बोललोय. माझ्यावर काय कारवाई करायची असेल तरी पोलीस करतील. मी कारवाई आणि चौकशीला तयार आहे. तसेच त्यांनी पुढे सांगितले, माझा शिवसैनिकांसोबत कोणताही वाद नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही माझ्यावर उपकार आहेत. त्यांच्यामुळे मी खासदार झालो. जे नेते माझ्याविरोधात बोलत आहेत, ते स्वतःची सुरक्षा सोडून इकडे काही करायला येणार आहेत का? हे काही करणार, तेव्हा आम्ही मार खाऊन घ्यायचा का?
Ketan Agrawal Murder : होयं, मला चेतन हवा होता, पण केतनला मी..,; सियाने सगळेचं पत्ते उघडले!
संजय राऊत यांच्याबाबत बोलताना त्यांनी म्हटले, मी संजय राऊत यांना खूप मानसन्मान दिलाय. 2004 मध्ये शिवसेनेच्या लीलाधर डाके यांच्या विरोधात मी निवडून आलो तेव्हा संजय राऊत यांनी मला मदत केली. किरीट सोमय्या यांच्या विरोधातही त्यांनी मला मदत केली होती. ही शिवसेनेविरोधात गद्दारी नव्हती का? तर आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना संजय दिना पाटील म्हणाले, मी आम्ही पाच लोकं मारली, जे बोललो ती घटना माझ्या जन्मापूर्वीची आहे. मला दहा लोकं लागत नाहीत, मी लोकांच्या मनावर राज्य करतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना त्यांनी दावा केला की, शिंदे साहेबांनी माझ्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली नाही, उलट मला शाबासकी दिली. मी मर्द लोकांबरोबर गेलो आहे, मर्दांची कदर करतात. ते नाराजी व्यक्त करत नाहीत. शिंदे साहेबांनी मला शाबासकी दिली आहे. एकीकडे पत्रकारांना दिलेली धमकी, दुसरीकडे आंदोलनकर्त्यांबाबतची आक्रमक भाषा आणि त्यानंतर संजय राऊत यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे UAPA कारवाईची मागणी केल्याने हे प्रकरण आता केवळ राजकीय वादापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यामुळे मुंबई पोलीस या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.