फेब्रुवारीचा हप्ता मिळाला मार्चचा कधी मिळणार? अदिती तटकरेंनी सांगूनच टाकलं..

Aditi Tatkare : राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारी महिन्यातील हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास दोन कोटी महिला लाभार्थ्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. पैसे जमा झाल्याचे मेसेज महिलांना येत आहेत. यानंतर मार्च महिन्याचा हप्ताही लवकरच जमा करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
या योजनेत फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांतील तीन हजार रुपये एकत्रित देण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार हप्त्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत 2 कोटी 52 लाख महिलांच्या खात्यात शुक्रवारी सायंकाळपासून पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आता मार्च महिन्याचे पैसे केव्हा मिळणार याची माहिती मंत्री तटकरे यांनी ट्विट करत दिली आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का? अदिती तटकरेंच्या वक्तव्याने खळबळ!
अदिती तटकरेंचे ट्विट काय
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरीत करण्याची प्रक्रिया 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 12 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये आणि मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, या योजनेवरून सध्या गोंधळाची स्थिती दिसून येत आहे. या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे माघारी घेतले जाणार नाहीत असे तटकरे आधी म्हणाल्या होत्या. नंतर मात्र त्यांनी पैसे माघारी घेणार असल्याचे सांगितले होते. यामुळे गोंधळ वाढला होता. परंतु, आज अजित पवार गटातील नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पैसे माघारी घेणार नसल्याचे माध्यमांंशी बोलताना स्पष्ट केले होते. एकूणच या योजनेवरून सत्ताधाऱ्यांतच गोंधळाची स्थिती दिसून येत आहे.
चार हजार महिलांनी घेतली स्वतःहून माघार
महिला बालविकास विभागाकडून लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात येणार आहे. जे लाभार्थी निकषात बसत नाहीत त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल. पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने ही ‘अर्ज माघार’ सुरू असल्याचे दिसून येत आहे. या महिलांना दंड आकारण्याचा कोणताही विचार नसला तरी, त्यांनी मिळवलेली रक्कम ‘थेट हस्तांतर योजने’शी संलग्न खात्यांमधून वसूल करण्यात येईल, असे अधिकारी स्पष्ट करत आहेत. परंतु, एकदा दिलेला लाभ पुन्हा मागे घेतला जाणार नाही, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले होते. तरी देखील महिलांकडून स्वतःहून पैसे परत केले जात असल्याचेही दिसून येत आहे.