हेमंत पाटलांना धोक्याची घंटा! भाजप हिंगोली घेण्याच्या अन् सरप्राईज उमेदवारही देण्याच्या तयारीत

हेमंत पाटलांना धोक्याची घंटा! भाजप हिंगोली घेण्याच्या अन् सरप्राईज उमेदवारही देण्याच्या तयारीत

हिंगोली : शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या कोणत्या जागांवर भाजप आपले उमेदवार उतरवणार? हा सध्याच्या राजकारणातील मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न. रत्नागिरी, मुंबई दक्षिण, नाशिक अशा शिवसेनेकडे (Shivsena) असलेल्या अनेक जागांवर सध्या भाजपने दावा सांगितला आहे. याच यादीत आता हिंगोलीचीही (Hingoli) भर पडली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे हेमंत पाटील (Hemant Patil) खासदार आहेत. मात्र भाजपकडून हिंगोली लोकसभा मतदार संघात सुरू असलेली जोरदार तयारी लक्षात घेता हेमंत पाटील यांची उमेदवारी आणि राजकीय भवितव्याबाबत आत्तापासूनच तर्कवितर्क लावले जात आहे. (In Hingoli Lok Sabha Constituency BJP is discussing the name of Shrikant Patil, Radheshyam Mopalwar and Ramdas Patil.)

भाजपचे केंद्रापासून स्थानिक पातळीपर्यंत सर्वच मंडळी वारंवार हिंगोली लोकसभा मतदार संघावर दावा करीत आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव, केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर आणि डॉ. भागवत कराज यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संघटनमंत्री संजय कौडगे यांनी हिंगोलीत दौरे काढले आहेत, बैठका घेतल्या आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशातील ओबीसी नेते आणि खासदार संगमलाल गुप्ता यांनी ओबीसी मोर्चाची बैठक घेतली. महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोलीत महिला मेळावा झाला.

“खबरदार, माझ्या वडिलांचा एकेरी भाषेत उल्लेख केला तर”… हर्षवर्धन पाटलांच्या लेकीचा मित्रपक्षांना इशारा

याच्या जोडीला नुकतेच अशोक चव्हाण यांचाही भाजपप्रवेश घडवून आणला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनुरी आणि हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि किनवट तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या सहा मतदारसंघांचा हिंगोली लोकसभेमध्ये समावेश होतो. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यावर अशोक चव्हाण यांचा मोठा प्रभाव आहे. 2014 मध्ये काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले होते. त्यात नांदेड आणि हिंगोली याच दोन मतदारसंघामधून अशोक चव्हाण आणि राजीव सातव यांनी विजय मिळवला होता.

या सगळ्यांमधून हिंगोली लोकसभेची जागा भाजपकडे आलीच पाहिजे आणि जिंकलीच पाहिजे, असा संदेश पद्धतशीरपणे पोहचवला जात आहे. भाजपची स्थानिक मंडळी खासदार पाटील यांच्या कामावर आणि कामाच्या पद्धतीवर बोट ठेवून या संदेशाला खतपाणी घालत आहेत. भाजपची ही तयारी लक्षात घेता पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्येही उत्साह आला आहे. तर शिवसेना खासदार हेमंत पाटील यांचे राजकीय भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपची ज्या पद्धतीने तयारी सुरू आहे, ते पाहता तर पाटील यांच्या उमेदवारीवर संभ्रमाचे ढग जमा होऊ लागले आहेत.

आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जर ही जागा भाजपकडे आली तर उमेदवार कोण असणार?

सध्या भाजपचे हिंगोलीचे विद्यमान आमदार तान्हाजीराव मुटकुळे, कळमनुरीचे माजी आमदार गजाननराव घुगे, विधान परिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते या नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहेतच. पण या व्यतिरिक्त आणखी तीन नावांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यात माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार, रामदास पाटील सुमठाणकर यांच्या आणि उद्योग क्षेत्राचे तज्ञ श्रीकांत पाटील यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. यातच रामदास पाटील सुमठाणकर यांच्याकडे हिंगोली लोकसभा मतदारसंघ प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर श्रीकांत पाटील यांच्याकडे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे संयोजकपद देण्यात आले आहे. त्यामुळेच राजकारणाव्यतिरिक्त असलेल्या या नावांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

रामदास पाटील सुमठाणकर कोण आहेत?

हिंगोली मतदारसंघात युवा नेतृत्वाला संधी देण्यासाठी मुख्याधिकारी पदाचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केलेले रामदास पाटील सुमठाणकर यांचे नाव चर्चेत आहे. हिंगोली, किनवट या ठिकाणी त्यांनी मुख्याधिकारी म्हणून कारकीर्द चांगलीच गाजवली आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या शिवाय वसमत विधानसभा मतदार संघ त्यांचा होमपिच असून, या ठिकाणीही त्यांनी चांगले काम केले आहे. भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांनी जनसंपर्क वाढवून सामान्य कार्यकर्त्यांसोबच जनतेच्या अडचणी जाणून घेत त्या सोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अल्पावधीतच त्यांची लोकसभा मतदार संघात ओळख निर्माण झाली आहे. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून मेळावे घेतले जात असून, भाजपच्या कार्यक्रमातूनही त्यांच्या कामाची माहिती दिली जाऊ लागली आहे.

राधेश्याम मोपलवार यांचेही नाव समीकरणात फिट बसते…

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना तिकीट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यातूनच माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचेही नाव हिंगोली मतदारसंघात चर्चेत आहे. यामागे आदिवासी आणि ओबीसी मतदारांची सांगड घालून नवी गणिते मांडली जात आहे. हिंगोली मतदारसंघातून यापूर्वी बंजारा समाजातील उत्तमराव राठोड, कोमटी समाजाचे विलास गुंडेवार आणि माळी समाजाचे राजीव सातव यांना यश मिळाले होते. या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. थोडक्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरणे महत्वाची ठरतात असेच दिसून आल्याने मोपलवार यांच्या नावाची चर्चा होत आहे. याशिवाय शिंदे-फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक हा फॅक्टरही मोपलवार यांच्यासाठी महत्वाचा ठरु शकतो.

श्रीकांत पाटील यांचे नाव ठरु शकते सरप्राईज पॅकेज…

हिंगोलीमध्ये मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या श्रीकांत पाटील यांनीही तयारीला सुरुवात केली आहे. श्रीकांत यांच्या रुपाने पाटील घराण्यातील तिसरी पिढी संघात कार्यरत आहे. आता त्यांच्या खांद्यावर हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीकांत पाटील यांना उच्च शिक्षित आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञ मानले जाते. त्यांना सध्या मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. ते सेंटर फॉर रिसर्च अँड इंडस्ट्रियल स्टाफ परफॉर्मन्स (CRISP) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्या आधी ते क्रिस्प सोसायटीचे अध्यक्षही होते.

श्रीकांत पाटील यांनी कौशल्य विकासमध्ये डॉक्टरेट (पीएचडी), मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असे उच्च शिक्षण घेतले आहे. याशिवाय पाटील यांनी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास क्षेत्रात काम करणाऱ्या समित्यांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य आणि रोजगार निर्मिती धोरणाचा मसुदा तयार करण्यात त्यांनी योगदान दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली आत्मनिर्भर भारत योजना तयार करण्यातही त्यांची प्रमुख भूमिका राहिली आहे. यासोबतच त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्येही काम केले आहे.

“खासदार होऊन तु्मच्यापासून दूर गेलो, दोन महिन्यांनंतर इकडेच येतो”; सुजय विखेंच्या मनात काय?

पाटील यांनी 32 देशांच्या कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या सर्वोत्तम प्रणालींचा अभ्यास करून आणि भारत सरकारच्या विविध मंत्री आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी विचारमंथन केल्यानंतर, स्वावलंबी भारत मिशनच्या माध्यमातून 5 वर्षात 11 क्षेत्रात 15 कोटी रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांच्या याच कामाचा आणि अनुभवाचा उपयोग करुन घेण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने त्यांची सेंटर फॉर रिसर्च अँड इंडस्ट्रियल स्टाफ परफॉर्मन्स (CRISP) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली असून त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचाही दर्जा आहे.

आता हेच श्रीकांत पाटील मागील काही दिवसांपासून हिंगोली मतदारसंघात कार्यरत आहेत. विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावून ते जनसंपर्क वाढवत आहेत. सामान्य कार्यकर्त्यांसोबच जनतेच्या अडचणी जाणून घेत त्या सोडण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अल्पावधीतच त्यांची लोकसभा मतदार संघात ओळख निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच पाटील यांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची भेट घेऊन हिंगोलीच्या विविध प्रश्नांवर चर्चा केल्याचे सांगितले होत. भाजपच्या इतर बड्या नेत्यांशीही पाटील यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे दिवंगत राजीव सातव यांच्यानंतर थेट केंद्रात ओळख असलेले पाटील हे हिंगोली जिल्ह्यातील दुसरे नेते ठरले होते. त्यांना उमेदवारी दिल्यास आणि निवडून आल्यास हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची कामे होण्यास मदत होऊ शकते अशी मतदारांना अपेक्षा आहे.

त्यामुळेच सध्या हिंगोलीमध्ये राजकाराव्यतिरिक्त या तिन्ही नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र सध्या तरी शिवसेनेच्या ताब्यात असलेली ही जागा भाजपकडे जाते का? आणि गेली तर उमेदवार कोण असणार? राजकारणी असणार का की राजकीय क्षेत्रातील सोडून माजी प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर, राधेश्याम मोपलवार की श्रीकांत पाटील या उच्च शिक्षित आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube