जरांगेच्या डोक्यावर परिणाम, तो काहीही बडबड करतोय, त्याने औकात ओळखावी; राणेंची घणाघाती टीका

  • Written By: Published:
जरांगेच्या डोक्यावर परिणाम, तो काहीही बडबड करतोय, त्याने औकात ओळखावी; राणेंची घणाघाती टीका

Narayan Rane on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण सुरू आहे. यावेळी त्यांनी पाणीही न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जरांगे यांनी मंगळवारी (13) संतप्त भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रात यापुढं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभा होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. नुसते नाटकं सुरू आहेत, तुम्हाला मराठे सोपे वाटतात का, असा सवालही जरांगेंनी केला. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं राणे म्हणाले.

मुख्यमंत्री खोट बोलतात पण रेटून बोलतात; आदित्य ठाकरेंची जहरी टीका 

मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने नुकताच अध्यादेश जारी केला होता. या अध्यादेशाचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही. तसंच अधिवेश घेण्यासही चालढकल केली जात आहे. त्यामुळं जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जरांगेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. यादरम्यान त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने मराठ्यांचा विश्वासघात केला असून नरेंद्र मोदी यांची सभा राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या वक्तव्यावर राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. नारायण राणे यांनी ट्विटरवर भूमिका मांडली आहे. यात त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ठरलं! इंडिया आघाडीचा महामेळावा ‘या’ दिवशी पुण्यात होणार, शरद पवार गटाच्या बैठकीत निर्णय 

राणे यांनी लिहिलं की, मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव! तेव्हा असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरूणावर पडून राहून नाटके करावीत, असं ट्वीट राणे यांनी केलं.

दरम्यान, जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे. अनेकांनी विनंती करून देखील जरांगेंनी पाण्याचा घोटही घेतला नाही. जरांगे यांच्यावर उपचाराची गरज असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र मागण्या मान्य होईपर्यंत काहीही नाही, असा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. त्यांच्या समर्थनार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, अहमदनगरसह राज्यभरात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे.

दरम्यान राणेंनी केलेल्या टीकेवर आता मनोज जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube