शिर्डीनंतर आता श्रीरामपूरलाही ‘डिफेन्स हब’; शेती महामंडळाची 4200 एकर जागा मंजूर
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मळा येथील शेती महामंडळाची ४२०० एकर जागा दारूगोळा स्फोटके, संरक्षण साहित्य निर्मितीसाठी मंजुरी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे.
Defence Hub : शिर्डीनंतर आता श्रीरामपूरमध्येही डिफेन्स हब होणार असून हरेगाव मळा येथील शेती महामंडळाची ४२०० एकर जागा दारूगोळा स्फोटके, संरक्षण साहित्य, (Defence Hub) सौर ऊर्जा प्रकल्प उद्योगांसाठी तर ३९०० एकर अकारी पड जमीन शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यामुळे औद्योगिक विकासातून रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतल्याचे सांगण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला शिक्षण मंत्री दादा भुसे, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.
दारूगोळा व स्फोटके संशोधन आणि विकास सुविधा निर्माण करण्यासाठी ‘डीआरडीओ’ला (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) १ हजार ५०० एकर, सौर पार्क व पवनऊर्जा प्रकल्पासाठी महाऊर्जाला १ हजार २०० एकर तसेच संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी निबे ऑर्डन्स अँड मेरीटाईम फॅक्टरीज लिमिटेडला १ हजार ५०० एकर अशी एकूण ४ हजार २०० एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘डीआरडीओ’ला मिळणाऱ्या जागेत उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळा उभारण्याचा प्रस्ताव आहे.
या तिन्ही संस्थांना ही जमीन ४९ वर्षांच्या भाडेकरार तत्त्वावर (लिजवर) देण्यात येणार आहे. यासाठी प्रति एकर ५० हजार रुपये वार्षिक भाडे निश्चित करण्यात आले आहे. तीन वर्षांचे भाडे एकाच वेळी भरावे लागणार आहे.
अकारीपड शेतकऱ्यांना ३ हजार ९०० एकर
संरक्षण साहित्य, सौर ऊर्जा प्रकल्प यांना जमीन दिल्यानंतर शेती महामंडळाकडे शिल्लक राहणारी २ हजार ३०० एकर जमीन व अन्य १ हजार ६०० एकर अशी एकूण ३ हजार ९०० एकर अकारीपड जमीन परिसरातील शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. मात्र या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही मंत्रिमंडळ उपसमितीने स्पष्ट केले.
दरम्यान, याआधी शिर्डीत तब्बल २०० एकर परिसरात खासगी क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षेपणास्त्र सामग्रीचा कारखाना सुरु करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेला बळ देत ‘निबे ग्रुप’ने खासगी क्षेत्रातून या आघाडीच्या प्रकल्पाची उभारणी केली असून या कारखान्यात भारतीय लष्करासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे ‘बॉम्ब शेल्स’ तयार केले जाणार आहेत. या कारखान्याची वार्षिक क्षमता तब्बल ५ लाख शेल्स तयार करण्याची आहे.