महायुतीत कोंडी, नगरचा भाजप नेता फुंकणार तुतारी; शरद पवारांच्या भेटीनंतर चर्चा तर होणारच..
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत तसा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस चांगलाच अॅक्टिव्ह झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापुरात महायुतीला धक्के दिल्यानंतर त्यांचा मोर्चा आता नगर जिल्ह्याकडे वळला आहे. येथे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांची चाचपणी केली जात आहे. त्यातच दुसऱ्या पक्षातील तुल्यबळ उमेदवार आपल्या पक्षात येण्यास तयार आहे का याचाही शोध घेतला जात आहे. आता या प्रयत्नात कोपरगावातील एक मोठा भाजप नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा नेता कदाचित तुतारी हाती घेऊ शकतो कारण कोपरगाव मतदारसंघात राजकीय गणितच अशी तयार झाली आहेत की त्यांच्यापुढे दुसरा पर्याय राहिल्याचे दिसत नाही.
येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका आहेत त्यापूर्वीच आता राजकीय पक्षांमध्ये मोठी उलथापालथ होत आहे. कोपरगावचे भाजपचे युवानेते विवेक कोल्हे हे बंडखोरीच्या तयारीत आहे. कोल्हे यांनी पुणे येथे शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याचे समजते आहे. विधानसभेसाठी इच्छुक असलेले कोल्हे यांनी पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोल्हे तुतारी हाती घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Ground Zero : विवेक कोल्हे तुतारी फुंकणार? काळेंना घेरण्यासाठी पवारांचा डाव
नगरमधील कोपरगाव विधानसभेच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र भाजप नेते विवेक कोल्हे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आज पुण्यामध्ये विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे उघड झाल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना बळ मिळालं. विवेक कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाया पडत शरद पवार यांचे आशिर्वाद घेतले. या भेटीनंतर आता पुन्हा एकदा विवेक कोल्हे हे शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
विधानसभ निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे तर राजकीय उमेदवारांकडून पक्षबदल सुरू आहे. यातच विधानसभा निवडणुका पाहता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) तसेच महायुतीमधील अनेक बडे नेते विधानसभेच्या निवडणुकांआधी तुतारी हाती घेण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.
कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीचाच, आमदार काळेंच्या दाव्याने कोल्हेंसमोर पेच
विवेक कोल्हेंच्या मनात नक्की काय?
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीत पेच निर्माण झाला आहे. येथील विद्यमान आमदार आशुतोष काळे अजित पवारांच्या गटात आहेत. इतकेच नाही तर अजितदादांनी आशुतोष काळेंची उमेदवारीही निश्चित केली आहे. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले विवेक कोल्हे यांची मोठी कोंडी झाली आहे. विवेक कोल्हे सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या नाशिक विभाग शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही त्यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. परंतु, त्यांना अपयश मिळाले. आता आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी पु्न्हा मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.