निवडणुकीत हरवलेलं आहेच, कोर्टातही तेच होईल…लंकेंचा विखेंवर पलटवार
Nilesh Lanke replies Sujay Vikhe : नगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार निलेश लंके यांच्या (Nilesh Lanke) निवडीला आव्हान देणारी याचिका सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. यावर लंके यांनी भाष्य केले आहे. काहींना आपला पराभव मान्यच नाही मात्र निवडणुकीत हरवलेलं आहेच आता कोर्टातही तेच होईल, अशा शब्दांत खासदार निलेश लंके यांनी विखेंच्या याचिकेवर पलटवार केला आहे.
संसदीय लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून लोक आपला प्रतिनिधी निवडतात. या प्रक्रियेत कुणाचा तरी पराभव झाला होणार हे निश्चित आहे. पण आपण आपला पराभवच होऊ शकत नाही अशी मानसिकता बाळगणे ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे. या मानसिकतेतूनच समोरचे पराभूत उमेदवार कधी निवडणूक आयोग तर कधी हायकोर्टात (High Court) जाताना दिसत आहेत. अर्थात हे त्यांना कायद्याने उपलब्ध करुन दिलेले मार्ग आहेत. या मार्ग तपासून जर त्यांना मनःशांती लाभत असेल तर त्यांना जे काय करायचं करू द्या, असा खोचक टोला निलेश लंके यांनी लगावला.
खासदारकीची लढाई कोर्टात; लंकेंच्या खासदारकीला सुजय विखेंचे न्यायालयात आव्हान
आपली बाजू सत्याची आहे आणि सत्यमेव जयते म्हणजे अखेर विजय सत्याचाच होतो हे ते कदाचित विसरलेले असावेत. ते सध्या खेळ खेळण्याचा प्रयत्न करत आहेत पण आपणही जिगरबाज खेळाडू आहोत. निवडणूक झाली, विरोध संपला. विधायक मार्गाने आपण सर्वजण जनहितासाठी पुढे जाऊ ही आपली भूमिका आहे पण त्यांना खेळच करायचा असेल तर आपणही व्यवस्थितपणे खेळू. निवडणुकीत हरवलेलं आहेच, कोर्टातही तेच होईल असा विश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केला.
लंकेंच्या खासदारकीला विखेंचे आव्हान
लोकसभा निवडणुका झाल्यानंतरही मात्र नगर दक्षिणेमधील लोकसभेच्या निकालावरून सुजय विखे आणि खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यामध्ये अद्यापही वाद सुरुच आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका माजी खासदार सुजय विखे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
1991 ची पुनरावृत्ती होणार का?
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विरुद्ध सुजय विखे हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. निवडणुकीत लंकेंनी विजयाचा गुलाल उधळला. काही मतदान केंद्रावरील मतमोजणी योग्य पद्धतीने झाल्या नसल्याचा आरोप करत विखे यांनी निवडणूक आयोगाकडे फेर पडताळणीची मागणी केली आहे. दरम्यान 1991 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्व. बाळासाहेब विखे पाटील यांना नगर दक्षिणेमधून पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख विजयी झाले होते.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ चार तीर्थ स्थळांचा समावेश
मात्र या निवडणुकीनंतर विखे यांनी गडाख यांच्या निवडीलाच आव्हान दिले होते. यशवंतराव गडाख आणि शरद पवार यांनी भाषणातून आपली बदनामी केली याचाच परिणाम मतांवर झाल्याचा दावा विखे यांनी केला होता. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेत सुनावणी होऊन नंतर गडाख यांची निवड रद्द झाली होती. हा खटला देशात गाजला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.