भंडारदरा धरणाची शताब्दी; कहाणी निर्मितीची !

Bhandardara Dam: 9 ऑगस्ट 1907 रोजी भंडारदरा धरणाला मान्यता मिळाली. धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली ती एप्रिल 1910 मध्ये.

  • Written By: Published:
Bhandardara Dam Construction Story Hundread Year

Bhandardara Dam: उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातल्या उदासवाण्या भूमिपुत्रांच्या आयुष्यात हिरवाई, चैतन्य आणि समृद्धीचे रंग भरणाऱ्या प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणाने (Bhandardara Dam) 10 डिसेंबरला शताब्दी वर्षात पदार्पण केलंय. या धरणाच्या पाण्याने जिरायत शेती बागायती झालीय. सहकारी साखर कारखानदारीला चालना दिली… उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झालाय. या धरणाच्या निर्मितीची रोचक कहाणी मांडलीय लेखक शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर. (Bhandardara Dam story hundread year)

शेंडी (भंडारदरा) गावाच्या बाजूला असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या भिंतीने जोडल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा अवखळ प्रवाह सह्यगिरीच्या कुशीत विसावला आणि भंडारदरा धरणाचा जन्म झाला! तेव्हापासून म्हणजे 10 डिसेंबर 1926पासून आजपर्यंत सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे पाणी भंडारदरा धरण आपल्या पोटात साठवतय. निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या भांडारदऱ्याचे पाणी जसे शेतात खेळू लागले, तशी समृद्धीची बेट फुलली. सहकारी साखर कारखानदारी उद्योगधंद्याची भरभराट झालीय. वर्षेनुवर्षे दुष्काळाने गांजलेल्या भूमिपुत्राच्या उदासवाण्या जीवनात या धरणाच्या पाण्यानं चैतन्याचे रंग भरले….

रतनगडाच्या माथ्यावरील रत्नाबाईच्या गुहेत अमृतवाहिनी हे सार्थ विशेषण लाभलेली प्रवरामाई उगम पावते. शेंडी गावाजवळ बांधलेल्या दगडी भिंतीमुळे भंडारदऱ्याचा 11 टीएमसीचा भलामोठा जलाशय निर्माण झालाय. अतिशय राकट आणि डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्र सपाटीपासून 2400 फुट उंचीवर आहे. त्यामुळे देशातील काही मोजक्या, खूप उंचीवरील जलाशयांमध्ये याची गणना होते. धरणाच्या निर्मितीपासून आजवरची कहाणी अत्यंत रोचक आणि रंजक अशीच आहे.

मातीचे धरण होणार होते पण ?

दुष्काळी भागास पाणी देण्याच्या हेतूने एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून पावले टाकायला सुरुवात झाली होती. 1902 च्या सिंचन आयोगाने प्रवरा खोऱ्यात धरण बांधण्याच्या गरजेवर विशेष भर दिला होता, हे उपलब्ध कागदपत्रं चाळली की आपल्या लक्षात येते. प्रवरा नदीवरील ओझर येथे 1899 मध्ये बांधलेला बंधारा त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणावे लागेल. या बंधाऱ्यातून बारमाही पाणी पुरविणे शक्य व्हावे, यासाठी अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे मातीचे मोठे धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. या धरणाला स्थानिकांचा विरोध होता. पुढे काही कारणांनी हा प्रस्ताव बारगळला.

धरणाच्या बांधकामाला प्रत्यक्षात 1910 मध्ये सुरुवात

सर्वेक्षणानंतर शेंडीजवळील दोन टेकड्याजवळ जागा निश्चित करण्यात आली. 9 ऑगस्ट 1907 रोजी भंडारदरा धरणाला तत्कालीन सरकारची मान्यता मिळाली. धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली ती एप्रिल 1910 मध्ये. तत्कालीन चीफ इंजिनिअर ऑर्थर हिल यावेळी आवर्जून उपस्थित होते. डोंगरदऱ्यातली एकूण 22 हजार 900 एकर जमीन पाण्याखाली बुडाली. जमिनीच्या संपादनासाठी तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने विशेष अधिकारी नेमला होता. धरणाच्या बांधकामासाठी स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली. धरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर साहित्य घोटी रेल्वेस्थानकावर उतरविले जाई. तेथून सध्याच्या घोटी -कोल्हार मार्गावरून पोचवण्यासाठी पेंडशेत-चिंचोडी ते भंडारदरा असा चार मैलाचा नवीन रस्ता तयार केला.

धरणाच्या दगडी बांधकामास आवश्यक दगड मिळवण्यासाठी परिसरातच दगडी खाणींच्या जागा निश्चित केल्या होत्या. धरणाचे बांधकाम जसजसे आकार घेऊ लागले तसा भंडारदऱ्याचा नितांत सुंदर, रमणीय आणि शांत परिसर गजबजून गेला. अधिकारी, आणि मजूर यांची निवासस्थाने उभी राहिली. निसर्गाच्या कुशीत, भौतिक जगापासून कोसो योजने दूर असलेल्या या भागात दूरध्वनी, टपाल, दवाखाने अशा सोयीसुविधा आल्या. त्यावेळच्या लोकांना याचे प्रचंड केवढे कुतूहल वाटत असे.

भंडारदरा धरणाचे वैशिष्ट्य

भंडारदरा धरणाच्या भिंतीच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण काम दगड आणि चुन्यात केले आहे. वाळू उपलब्ध नसल्याने दगडांचा चूरा करून तो वाळू म्हणून वापरला आहे. थोडेथिडके नव्हे तब्बल 1 कोटी 26 लाख 4 हजार 140 घनफूट बांधकाम करायचे होते. जसजसे बांधकाम उंची गाठत होते, तसे पाणी अडविण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर 1920 मध्ये धरणात 200 फूट उंचीपर्यंत पाणी साठवले होते. त्याच वर्षी सर्वप्रथम धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. बांधकामाने पुढे चांगलाच वेग घेतला होता. नियोजनाप्रमाणे भिंतीची उंची 250 फुटापर्यंत बांधण्याचे ठरले होते. पुढे त्यात बदल केला गेला. ही उंची 20 फुटांनी वाढवून 270 फुट करण्यात आली. धरणाच्या भिंतीत एकूण चार मोऱ्या असून, त्या अनुक्रमे 70 फूट, 120 फूट, 170 फूट व 220 फूट अशा अंतरावर आहे. या मोऱ्यांचे पाइप आणि त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक झडपा खास इंग्लंडमधून आणण्यात आल्या. भिंतीच्या तळाची रुंदी 71.28 मीटर असून, माथ्यावरील रुंदी सात मीटर आहे. बांधकाम सुरू असतानाच 1916 मध्ये प्लेगची साथ आली. काळजीचे ढग गोळा झाले. तत्कालीन सरकारने उंदीर मारण्यासाठी खास पथक नेमले होते.

जून 1926 मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले. त्यासाठी 1 कोटी 50 लाख 83 हजार 451 रुपये खर्च झाला होता. भिंतीच्या दक्षिण बाजूला 650 फूट रुंदीचा सांडवा ठेवण्यात आला. याच वर्षी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास सुरुवात झाली. पावसाळा सुरू झाला. घाटघर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील शिखरस्वामिनी कळसुबाई, अलंग, मदन, कुलंग, पाबर आणि रतन या गडांच्या माथ्यावर कोसळणाऱ्या पावसांच्या सरीमुळे अवतीर्ण झालेले ओढे-नाले कवेत घेऊन धरणाचे पोट हळूहळू भरू लागले.

काळ्या पाषाणाच्या भिंतीमुळे प्रवरामाई पहिल्यांदाच सह्यागिरीच्या डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावली. 10 डिसेंबर 1926 रोजी मुंबई इलाक्याचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते धरणाचे औपचारिक लोकार्पण झाले. सर्वेक्षणापासून बांधकामात महत्त्वाची भूमिका पार पाडलेले तेव्हाचे कार्यकारी अभियंता ऑर्थर हिल यांचे नाव धरणाच्या जलाशयाला दिले. जवळच वसलेल्या भंडारदरा या खेड्याच्या नावावरून धरणास भंडारदरा धरण असेच नाव पडले. रूढही झाले. कागदोपत्री हे धरण विल्सन यांच्याच नावाने ओळखले जाते.

दुर्गम भागात राहून देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या आर्थर हिलसारख्या अभियंत्याच्या कामाची नोंद घेत त्याचे नाव जलाशयाला देणे ही बाब ब्रिटिश शासकांच्या संवेदनशील कार्यपद्धतीची एका अर्थाने साक्ष देते. अलीकडेच या परिसरातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव जलाशयाला देण्याची मागणी पुढे आली होती. त्यासाठी राज्य सरकारकडे ताकदीने पाठपुरावा करायला लागेल.

लाभक्षेत्रावरील जमिनीला कालव्यांद्वारे पाणी

साठवलेले पाणी नियोजन करून लाभक्षेत्रावरील जमिनीला कालव्यांद्वारे मिळू लागले. धरणाच्या खाली वाहती प्रवरा नदी म्हणजे कालवाच आहे. या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याचे संपूर्ण चित्रचरित्रच पालटवले. दुष्काळाने गांजलेल्या उदासवाण्या भूमिपुत्रांच्या जीवनाला हिरवे वळण मिळाले. ओसाड-उजाड जागेवर, बरड माळरानांवर हिरवीगार पिके मोठ्या डौलान डोलू लागली. समृद्धी आली. कृषी औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. सहकारी साखर कारखाने उभे राहिले. आणखी काही पूरक उद्योग सुरु झाले. उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झाला.

काठोकाठ भरलेल्या धरणाच्या भिंतीला तडे

सारे कसे व्यवस्थित सुरु असतानाच 1969 च्या सप्टेंबर महिन्यात जलाशय काठोकाठ भरलेला असताना धरणाच्या भिंतीला तडे गेले. त्यातून पाणी बाहेर पडू लागले. लाभक्षेत्रात सगळीकडे काळजीचे वातावरण पसरले. अभियंत्यांनी जीव धोक्यात घालून, अहोरात्र खपून या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड दिले. लोखंडी सळ्या टाकल्या, मुख्य भिंतीला आधारभिंती बांधल्या. आणखी जे जे शक्य होते ते करून मजबुतीकरण केले.

भंडारदरा धरणाची सध्याची साठवण क्षमता आहे 11 हजार 39 दशलक्ष घनफूट. नाशिक येथील अभियांत्रिकी संशोधन संस्थेने(मेरी) उपहारग्रहाद्वारे साठवण क्षमता व गाळ सर्वेक्षणाबाबतचा अभ्यास केला. या अभ्यासात धरणाच्या साठवण क्षमतेत सुमारे सव्वाचारशे दशलक्ष घनफुटाने वाढ झाल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला. त्यावरून निर्माण झालेले वादळ मात्र पेल्यातीलच ठरले. धरणात गाळ साचलेला नसल्याने साठवण क्षमता आहे तेवढीच आहे, असे अभ्यासकांचे मत आहे.

कमिटेड वॉटर विरुद्धचा लढा!
पूर्वेकडील श्रीरामपूर, लोणी भागात ऊसासारखी बारमाही पिके फुलवणारे प्रवरेचे वाहून जाणारे पाणी संगमनेर-अकोलेकरांच्या नजरांना खुणावू लागले. यातूनच ऐंशीच्या दशकात ‘कमिटेड वॉटर’ विरुद्धचा लढा संगमनेर-अकोलेकरांनी खांद्याला खांदा लावून लढविला. सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले. 1984 मध्ये भंडारदऱ्याच्या पाण्याचे फेरवाटप झाले. संगमनेर-अकोल्याला धरणातून हक्काचे पाणी मिळाले. त्याआधी प्रवरा कालवा आहे त्यावर पंप बसवता येणार नाहीत असे सांगण्यात येत असे.

पाण्याचे फेरवाटप झाल्यानंतर नदीवर पंप बसवून काही किलोमीटर अंतर पाइपलाइन करून शेतकऱ्यांनी शेतात पाणी आणले. प्रवरा परिसर सुजलाम सुफलाम झाला. मात्र 1990 नंतर भंडारदऱ्याचे पाणी हा लाभक्षेत्रात संघर्षाचा मुद्दा म्हणून समोर आला. पाण्याची होणारी उधळपट्टी, आवर्तनांचा कालावधी, पाण्यातील भ्रष्टाचार यातून मोर्चे, धरणे, आंदोलने, घेराव यातून काहीजणांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यास सुरुवात केली. पाटपाणी हाच उत्तर नगर जिल्ह्यात राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला. अनेक नेते आणि कार्यकर्ते पाटपाण्याच्या आंदोलनातून पुढे आले आहेत. मराठवाडा भागातील लोकप्रतिनिधी आणि पाटपाण्याच्या क्षेत्रातील अभ्यासकांचे आग्रह यातून वीस वर्षांपूर्वी समन्यायी पाणीवाटपाचे धोरण ठरवले गेले. पाऊस कमी पडला की भंडारदरा आणि निळवंडे यांसह नाशिक जिल्ह्यातील काही धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडणे भाग असते. त्याबद्दल लाभक्षेत्रात नाराजीचा सूर आहे. मात्र त्यासाठी समन्यायी पाणीवाटपाचे धोरण बदलण्यासाठी प्रयत्न करायला लागतील.

जलविद्युत प्रकल्पही उभारला

दरम्यानच्या काळात भंडारदरा धरणाच्या पाण्याचा उपयोग शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मर्यादित न राहता जलविद्युत निर्मितीसाठीही होऊ लागला. भंडारदरा आणि कोदणी येथील दोन्ही जलविद्युत प्रकल्पातून 44 मेगावॉट वीज निर्माण केली जाते. भंडारदऱ्याचा निळाशार, अथांग पसरलेला जलाशय म्हणजे साक्षात चैतन्याचा अविष्कार असतो. अमृतवाहिनी प्रवरेच्या पाण्याची चवही न्यारीच आहे. या पाण्यानं लाभक्षेत्रात समृद्धीची बेटे फुलविली असली तरी पाणलोट क्षेत्रातील दैन्य अजूनही आहे तसेच आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यासाठी धरणात बुडीत बंधारे बांधण्याची मागणी होत आहे. भंडारदरा धरण परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याच्या दृष्टीने एक आराखडा तयार केला होता. हा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव मध्यंतरी जलसंपदा विभागाने तयार केला होता. पाणलोट क्षेत्रातील आदिवासींनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी राजकीय वजन पणाला लावले. प्रस्ताव बारगळला. पाणलोट क्षेत्रात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला पूर्णविराम मिळाला. ते बाकी काहीही असो. बारा महिन्यांतील कोणत्याही दिवशी पर्यटनासाठी हा परिसर नितांत सुंदर असाच आहे. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची येथे मोठी गर्दी उसळते. येथील भेट आनंद देते, चित्तवृत्ती प्रसन्न करते.
————–
भाऊसाहेब चासकर
(अकोले-लेखक शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत.)

follow us