ठाकरेंचा एका दगडात दोन ‘पक्षांवर’ निशाणा; उन्मेष पाटील अन् करण पवारांचा भाजपला ‘राम-राम’

ठाकरेंचा एका दगडात दोन ‘पक्षांवर’ निशाणा; उन्मेष पाटील अन् करण पवारांचा भाजपला ‘राम-राम’

जळगाव : तिकीट कापल्याने भाजपवर (BJP) नाराज असलेल्या खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil ) यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. उद्या (3 एप्रिल) दुपारी साडे बारा वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री निवासस्थानी पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाटील यांच्यासोबतच पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. (BJP MP Unmesh Patil is going to join Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party.)

जळगाव मतदारसंघातून भाजप खासदार उन्मेश पाटील तिसऱ्यांदा इच्छुक होते. परंतु, भाजपने त्यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पाटील काही दिवसांपासून नाराज होते. तेव्हापासूनच ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करु शकतात, अशी चर्चा होती. अशात त्यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेटही घेतली. त्यानंतर आता उद्या पाटील यांचा प्रवेश होणार असून त्यांना ठाकरेंकडून लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

उन्मेष पाटील यांच्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, अनेक वर्ष ते (उन्मेश पाटील) भाजपाचे काम करत आहेत. अनेक चळवळीशी ते जोडलेले आहेत. त्यांची प्रतिमा उत्तम आहे, तरी देखील भाजपने त्यांची उमेदवारी कापली. त्याबद्दल आम्हाला आश्चर्य आहे. ते अस्वस्थ आहेत हे नक्की. ते आम्हाला भेटले चर्चा झाली. आता ते पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले आहेत. उद्यापर्यंत सर्व कळेल अशा सूचक शब्दांत संजय राऊत यांनी खासदार उन्मेश पाटील यांची मन की बात सांगितली होती.

करण पवार पारोळ्यातून विधानसभेच्या मैदानात?

करण पवार हे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांचे पुतणे आहेत. याशिवाय उन्मेष पाटील यांचे निकटवर्तीय समजले जातात. गत नगरपालिका निवडणुकीत ते नगराध्यक्षपदी निवडून आले होते. आता ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना पारोळ्याचे शिवसेना आमदार चिमणराव पाटील यांच्याविरोधात तिकीट मिळण्याची शक्यता आहे. चिमणराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने ठाकरे तिथे नव्या चेहऱ्याच्या शोधात होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज