रक्षा खडसेंना कोण टक्कर देणार? शरद पवार, एकनाथ खडसेंची बंद दाराआड खलबतं
Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पार्टीने रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपने पत्ते खुले केले. त्यानंतर विरोधी पक्षातील राजकारणाने वेग घेतला आहे. काल मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार एकनाथ खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, रावेर मतदारसंघात आता मविआ कोणता उमेदवार देणार? एकनाथ खडसे सुनेविरुद्ध उमेदवारी करणार का? असे प्रश्न मात्र उपस्थित झाले आहेत.
भारतीय जनता पार्टीने बुधवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली त्यात रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली. रावेर मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा स्ट्राँग होल्ड असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात दोन वेळेस रक्षा खडसे या भाजपाच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. यंदा मात्र जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना घडल्या. भाजपातील कारभाराला कंटाळून एकनाथ खडसेंनी पक्ष सोडला. शरद पवारांना साथ दिली. त्यानंतर गौणखनिजाच्या प्रकरणाचा ससेमिराही खडसे कुटुबियांच्या पाठीमागे लागला.
या घडामोडींनंतरही भाजपने रक्षा खडसेंनाच तिकीट दिलं. आता विरोधकांचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एकनाथ खडसे, रोहिणी खडसे आणि शरद पवार यांची बैठक झाली. रक्षा खडसे यांच्यासमोर कोणता उमेदवार द्यायचा याबाबत तिघांमध्ये चर्चा झाली. काल एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते की माझी या मतदारसंघात निवडणूक लढण्याची इच्छा होती. पण, वैद्यकिय कारणांमुळे लोकसभा निवडणूक लढेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे या मतदारसंघात योग्य पर्याय देण्यासाठी आम्ही शरद पवारांबरोबर चर्चा करणार आहोत.
यानंतर तिघांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, रक्षा खडसे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असेल, एकनाथ खडसे नाही तर त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली तर रोहिणी खडसे विरुद्ध रक्षा खडसे अशी लढत पहायला मिळेल. तसेच भाजपविरोधात लढायचे की कमी क्षमतेचा उमेदवार देऊन जागा सोडायची अशीही कोंडी महाविकास आघाडीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Maharashtra Budget Session : एकनाथ खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये सभागृहातच खडाजंगी