आजी-माजी आमदार पुन्हा भिडणार; श्रीगोंद्यात महायुतीत मिठाचा खडा.. वाचा, नक्की काय घडलं?

आजी-माजी आमदार पुन्हा भिडणार; श्रीगोंद्यात महायुतीत मिठाचा खडा.. वाचा, नक्की काय घडलं?

Shrigonda Politics : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदार संघामध्ये सध्या विरोधक हे काही उरलेच नसल्याचं चित्र सध्या तरी निर्माण झालं आहे. कारण भाजपचे विक्रम पाचपुते हे विजयी झाले व आमदार झाले. (Politics) त्यांच्या विरोधात लढणारे राहुल जगताप व नागवडे कुटुंबीय हे देखील आता अजित पवार गटात सामील होत महायुतीत सहभागी झाले. मात्र, आता विरोधक आता एकत्र जरी आले असले तरी मात्र मनातील राग किंवा राजकारणातील अंतर्गत संघर्ष हा कोणत्या न कोणत्या कारणातून समोर येतच असतो.

गुटखाबंदीवरून सरकारला घेरणाऱ्या आमदार पाचपुतेंना आता त्यांच्याच मित्र पक्षातील माजी आमदार राहुल जगताप यांनी घेरले आहे. अनेक गंभीर आरोप जगताप यांनी पाचपुतेंवर केले आहे. दरम्यान, या वादामुळे महायुतीमधील आजी माजी मधील धुसफूस हि चव्हाट्यावर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या एक दुसरा सोडला तर इतर उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदार संघामध्ये देखील अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मतदार संघामध्ये विक्रम पाचपुते , अनुराधा नागवडे व राहुल जगताप यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. पाचपुते यांनी विजयाचा गुलाल उधळत नागवडे व जगतापांना पराभवाची धूळ चाखवली. यामुळे श्रीगोंद्यामध्ये पाचपुतेंची ताकद असल्याचे हे अधोरेखित झाले.

Market Committee elections : श्रीगोंदा बाजार समितीसाठी पाचपुते-नागवडे कट्टर विरोधक एकत्र

विधानसभा झाल्या आता काही दिवसांपूर्वी नागवडे व जगताप या दोन्ही साखर कारखानदारांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये पक्ष प्रवेश केला. अडचणीत असलेल्या आपल्या साखर कारख्यांना अर्थमंत्री अजित दादांच्या अर्थ साहाय्याने पुन्हा उभारी मिळेल या आशेने दोघांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान आता श्रीगोंद्यामध्ये विरोधकच शिल्लक राहिला नाही अशी चर्चा होती. कारण, पाचपुते भाजपमध्ये व नागवडे व जगताप यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने दोघेही महायुतीमधील मित्र पक्ष झाले. यामुळे आता पाचपुतेंना विरोधकच राहिला नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र असे असताना आता अजित पवार हे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना माजी आमदार राहुल जगताप यांनी गुटखा बंदीच्या मुद्द्यावरून तसेच भेसळखोरीच्या मुद्द्यावरून आवाज उठविणारे आमदार विक्रम पाचपुते यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

अवैध गुटखा विक्रीचा विषय आमदार जगताप यांनी उपस्थित केला. परंतु श्रीगोंदा तालुक्यात चौकशी केली, तर आजपर्यंत गुटख्याचे हप्ते कुणी घेतले? त्यामध्ये काही मागे पुढे झाले का? यामुळे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला? इतकी वर्ष झाले त्यांचे वडील बबनराव पाचपुते आमदार होते, त्यांच्याकडे सत्ता होती, इतके वर्ष त्यांनी हा मुद्दा का उपस्थित केला नाही. पोलीस प्रशासन काम करीत नव्हते का? पोलीस काम करत नसतील तर त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन का दिले नाही? हा विषय घेतल्यानंतर काही शिजणार आहे का? याचीही चौकशी झाली पाहिजे. असे म्हणतच जगताप यांनी थेट आमदार विक्रम पाचपुतेंवर हल्लाबोल केला.

दरम्यान जगताप यांच्या आरोपाला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाचपुते यांनी प्रत्युत्तर दिले असल्याच्या चर्चा स्थानिक राजकारणात रंगू लागल्या आहेत. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहे. त्यापूर्वी आता प्रत्येक पक्षाकडून राजकीय मोर्चेबांधणी हि सुरु आहे. दरम्यान आगामी निवडणुका अन त्यापूर्वीच श्रीगोंदा मतदार संघामध्ये आजी माजी आमदार यांच्यामधील मतभेद हे थेट चव्हाट्यावर आले आहे. याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्र पक्षात जरी महायुती म्हणून एकत्र आले असले तरी दोन राजकीय शत्रू हे एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नसल्याचे या माध्यमातून समोर येत आहे . दरम्यान येणाऱ्या काळात पक्षातील वरिष्ठ याबाबत चर्चा करणार का व हे शीतयुद्ध संपणार कि वेगळी राजकीय घडामोड घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे .

follow us
  • fb
  • instagram
  • youtube