“फडणवीस-महाजन नड्डांपेक्षाही मोठे नेते, त्यांच्यामुळेच माझा..” नाथाभाऊंची खोचक पण थेट टीका
Eknath Khadse Criticized Devendra Fadnavis : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या (Eknath Khadse) भाजप प्रवेशाबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे. भाजपात प्रवेश झाल्याचे त्यांच्याकडून सांगितलं जात असलं तरी अधिकृत घोषणा झालेली नाही. राज्यातील नेते यावर काहीच बोलण्यास तयार नाहीत आणि विशेष म्हणजे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही याचा खुलासा केलेला नाही. या गोंधळातच आता एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यापेक्षा फडणवीस आणि महाजन मोठे नेते आहेत, अशी खोचक टीका नाथाभाऊंनी केली आहे.
नाथाभाऊंच्या भाजपवापसीला ब्रेक! राज्यातील नेत्यांचा दिल्लीत डाव अन् रखडला पक्षप्रवेश
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने खडसे यांची सून रक्षा खडसे यांना रावेर मतदारसंघातून तिकीट दिले होते. रक्षा खडसे या मतदारसंघातून पुन्हा विजयी झाल्या. राज्यात सर्वत्र पडझड झालेली असताना रक्षा खडसे मात्र विजयी झाल्या. यासाठी एकनाथ खडसेंची मदत घेण्याची दिल्लीतील नेत्यांची भूमिका घेतली होती. त्यांची मदत झालीही. खडसेंनी स्वतः राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याचे टाळले. निवडणुकीच्या वेळीही त्यांनी रक्षा खडसेंच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती. यानंतर नाथाभाऊ लवकरच भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जात होते.
माझ्या काही अडचणींमुळे मी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला होता. अडचणी आजही कायम आहेत. माझी आमदारकी अजूनही चार वर्षे कायम आहे. भाजपला जर माझी गरज नसेल तर माझा मूळ पक्ष काय वाईट असा सवाल खडसेंनी विचारला. मी कन्फ्यूज आहे हे मान्य. पण पाच ते सहा महिने भाजपने मला प्रवेश देऊनही तो जाहीर केला नाही. याचा अर्थ माझी त्यांना गरज नाही असेच दिसत आहे, अशी खंत खडसेंनी व्यक्त केली.
आधी मंत्रिपदाचा राजीनामा नंतर पक्षच सोडला
दरम्यान, शरद पवार गटात प्रवेश करण्याआधी सन 2009 ते 2014 या काळात एकनाथ खडसे विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात 120 जागांवर विजय मिळवला. त्यावेळी खडसे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. परंतु, पक्षाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. खडसे यांना मात्र काही महत्वाच्या खात्यांवर समाधान मानावे लागले. यानंतर 2016 मध्ये एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पुढील चार वर्षे ते राजकारणात विजनवासात पडले होते.
लाडकी बहिण योजनेचा तुमच्या मनात पोटशूळ उठलायं; रुपाली पाटलांची खडसेंना चपराक
पुढे 2020 मध्ये मात्र त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मागील चाळीस वर्षे भाजपात राहिल्यानंतर पक्ष का सोडावा लागला याचं उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हेच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली पण खडसेंनी मात्र शरद पवार गटातच राहणे पसंत केले होते.