नाथाभाऊंच्या भाजपवापसीला ब्रेक! राज्यातील नेत्यांचा दिल्लीत डाव अन् रखडला पक्षप्रवेश

नाथाभाऊंच्या भाजपवापसीला ब्रेक! राज्यातील नेत्यांचा दिल्लीत डाव अन् रखडला पक्षप्रवेश

Eknath Khadse : ‘होय, मी भाजपात प्रवेश करणार आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत दिल्लीतच माझा पक्षप्रवेश होईल’, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवापसीचे संकेत दिले होते. पण आता या घोषणेला पंंधरा दिवस उलटून गेले तरी खडेस स्वगृही परतलेले नाहीत. पंगतीला बसले आणि बुंदी संपली.. असाच काहीसा प्रकार त्यांच्याबाबतीत घडला आहे. खडसेंचा पक्षप्रवेश का रखडला याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकनाथ खडसे पुन्हा भाजपात आल्यास तोटाच जास्त होईल असे राज्यातील काही नेत्यांनी दिल्लीश्वरांना पटवून दिल्याने खडसेंचा पक्षप्रवेश रखडला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने खडसे यांची सून रक्षा खडसे यांना रावेर मतदारसंघातून तिकीट दिले. रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत. भाजपाच्या चारशे पारच्या घोषणेत एक-एक खासदार महत्वाचा आहे. त्यामुळे रक्षा खडसे कोणत्याही परिस्थितीत विजयी झाल्या पाहिजेत. यासाठी एकनाथ खडसेंची मदत घेण्याची दिल्लीतील नेत्यांची भूमिका आहे. त्यासाठी खडसे यांना पुन्हा पक्षात आणण्याचा या नेत्यांचा विचार आहे. स्वतः खडसे यांनीच या चर्चांना दुजोरा दिला होता. मात्र, यानंतर पुढं काहीच घडलं नाही.

Loksabha Election 2024 : मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं; सुरत मतदारसंघात ‘कमळ’ फुललं..

आता तर अशी माहिती मिळाली आहे की काही स्थानिक नेत्यांच्या त्यांचा पक्षप्रवेशाला विरोध आहे. एकनाथ खडसे भाजपात आल्याने पक्षाचा फायदा होण्याऐवजी तोटाच होईल, असा निरोप या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना पाठवला आहे. कारण त्यांना एकनाथ खडसे पक्षात नको आहेत. त्यामुळेच एकनाथ खडसेंनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याची बातमी फुटताच या नेत्यांनी फिल्डिंग लावली. एकनाथ खडसे पुन्हा पक्षात आले तर फायद्याऐवजी तोटाच जास्त होईल असे या नेत्यांनी सांगितले. हाच एक मोठा खोडा खडसेंच्या पक्षप्रवेशात निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

आधी मंत्रिपदाचा राजीनामा नंतर पक्षच सोडला

दरम्यान, शरद पवार गटात प्रवेश करण्याआधी सन 2009 ते 2014 या काळात एकनाथ खडसे विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात 120 जागांवर विजय मिळवला. त्यावेळी खडसे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. परंतु, पक्षाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. खडसे यांना मात्र काही महत्वाच्या खात्यांवर समाधान मानावे लागले. यानंतर 2016 मध्ये एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पुढील चार वर्षे ते राजकारणात विजनवासात पडले होते.

Eknath Khadase यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नलची गरज नाही, आमचा दुपट्टा तयार; बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

पुढे 2020 मध्ये मात्र त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मागील चाळीस वर्षे भाजपात राहिल्यानंतर पक्ष का सोडावा लागला याचं उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हेच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली पण खडसेंनी मात्र शरद पवार गटातच राहणे पसंत केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube